लालपरीचा प्रवास महाग? १४% भाडेवाढीचा प्रस्ताव; शंभर रुपयांमागे होऊ शकते १५ रुपये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 06:38 AM2024-12-01T06:38:38+5:302024-12-01T06:39:57+5:30
दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या १०० रुपयांच्या तिकिटामागे १५ रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला.
यवतमाळ : एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.
दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या १०० रुपयांच्या तिकिटामागे १५ रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला.
दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी की वेगळा मार्ग?
■ यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीट दरवाढ झाली होती. आता सुरुवातीला १२.३६ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे महामंडळाच्या वाहतूक विभागाने पाठविला होता.
■ या प्रस्तावावर महामंडळ स्तरावर खलबते झाल्यानंतर त्यात वाढ करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा प्रस्ताव १४.१३ टक्के एवढा करण्यात आला आहे. शासन १२.३६ ला की १४.१३ टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देते की यातून दुसरा मार्ग काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.