महाराष्ट्राची लालपरी
By admin | Published: June 1, 2017 04:26 AM2017-06-01T04:26:14+5:302017-06-01T04:26:14+5:30
महाराष्ट्र राज्याची गेल्या सहा दशकांत जी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे, त्यामध्ये
- रत्नपाल जाधव -
महाराष्ट्र राज्याची गेल्या सहा दशकांत जी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे, त्यामध्ये लालपरी अर्थात एस.टी. बसचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुर्गम, अतिदुर्गम खेड्यापाड्यातील कच्च्या रस्त्यावरील धुरळा उडवत उन-पावसाची तमा न बाळगता एस. टी.ने अविरत सेवा केली आहे. केवळ गावच नव्हे तर माणसातील नातीही जोडली, अशा एस.टी. महामंडळाच्या सेवेला १ जून रोजी ६९ वर्षे पूर्ण होत आहेत..
एस. टी.चा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर १ जून १९४८ रोजी केवळ ३५ बेडफोर्ड वाहनांवर एस. टी.ची सुरुवात झाली. गाडीच्या टपाला चंदेरी व बाह्य अंगाला निळा अशी ही पहिली बेडफोर्ड गाडी. ३० प्रवाशांसह ही गाडी नगरहून पुण्याकडे निघाली. त्यानंतरचे अनेक चढउतार गेल्या ६९ वर्षांत एसटीने पाहिले आहेत.
खाकी गणवेश व डोक्यावर कॅप हा चालक व वाहकाचा पेहराव. गावात या सरकारी वाहनाचा व चालक-वाहकांचा होणारा सन्मान आजही खेड्यापाड्यातून तसाच आहे. गावचे सरपंच व कोतवाल त्यांची अगदी जेवणापासून ते राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत काळजी घेत, कारण तशी खेड्यात दुसरी काहीच सोय नव्हती. प्रवासी वाहनांची गरज जसजशी वाढू लागली तसतसा एस. टी.चा विस्तारही होऊ लागला.
आपल्या गावात एस. टी. यावी म्हणून अख्खा गाव अंगमेहनतीने रस्ता तयार करायचा. ज्या दिवशी एस. टी. गावात यायची असेल त्यादिवशी संपूर्ण गाव पताकांनी सजायचा. बँड पथकाच्या सहाय्याने वाजत गाजत एस. टी.बसचे स्वागत व्हायचे. टप्प्याटप्प्याने जिथे गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे एस. टी. या शासनाच्या धोरणानुसार एस.टी. बस धावू लागली. एस. टी.ने खेड्यातील व शहरातील अंतर कमी केले. माणसातील नाती जोडली. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लाखो विद्यार्थ्यांना रोज ने-आण करून शिकवते आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम एस. टी. करत आहे.
एस.टी.चा सुरुवातीचा काळ खूप खडतर व अडचणीचा होता, खराब रस्ते त्यामुळे एस. टी. बंद पडण्याचे प्रसंग वारंवार येत. अवजाराची पेटी सोबतच असायची. डेपो मॅनेजरलासुद्धा पत्र्याच्या शेडमध्ये काम करावे लागत असे. कर्मचाऱ्यांनादेखील चिखलात काम करावे लागत असे. अक्षरश: पावसात भिजत कर्मचारी वाहनाची देखभाल करत असत. अशाच कर्मचाऱ्यांच्या जिवावर हा डोलारा उभा राहिला, विस्तारत गेला, पहाता पहाता एस. टी. ला ६९ वर्ष पूर्ण झाली.
एस.टी.ने विविध घटकांना शासनाच्या धोरणानुसार ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सवलती दिलेल्या आहेत. त्यामध्ये अंध, अपंग, क्षयरोगी, कर्करोगी, विद्यार्थी यांना ५०% प्रवासात सवलत. अहिल्या बाई होळकर योजनेंंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या दुर्गम भागातील विद्यार्थीनींना १००% सवलत. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत, शाळा कॉलेजांना सहलीमध्ये सवलत. राज्यातील छत्रपती, दादोजी कोंडदेव, अर्जुन व द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना १००% सवलत. विद्यार्थी प्रासंगिक करार ५०% सवलत. दलितमित्र पुरस्कारर्थींना १००% सवलत. शासनमान्य पत्रकार अशा सर्वांना टप्प्या टप्प्याने सवलती देऊन एस. टी.ने समाजाप्रती आपली सामाजिक बांधीलकी जोपासलेली आहे.
एस. टी. बसमुळेच विद्यार्थ्यांचे शहरात येऊन पुढील शिक्षण घेणे शक्य झाले. शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एस. टी. बसनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत. त्यात खुशालीचे पत्र व निरोपही असत. संपूर्ण ग्रामीण यंत्रणाच एस. टी. बसवर अवलंबून होती. एखादी बाळंतपणासाठी असलेली भगिनी असो व सर्पदंश झालेला रुग्ण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एस. टी.चेच वाहन गावकऱ्यांच्या उपयोगी पडत असे. होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, सण-उत्सव व लग्न सराई मध्ये प्रवाशांची ने-आण एस. टी. वरच अवलंबून असायची.
१९८८ सुधारीत मोटार वाहन अधिनियमानुसार पर्यटक बस परवान्यांचा सरकारने मुक्तपणे खाजगी लोकांना देऊ केल्याने एस. टी.चे खच्चीकरण सुरू झाले.
या प्रतिकूल परिस्थितीतही एस. टी.ची सेवा सुरुच होती. नव्या संकल्पना सुरु झाल्या. प्रवाशी शतक योजना, प्रवाशी वाढवा अभियान, कामगारांच्या मानसिकतेत बदल, प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची हमी आदी प्रयत्नांतून एस. टी. पुन्हा सावरली. यासाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा एक कर्मचारी म्हणून मला गर्व आहे.