चारा घोटाळ्यावेळी लालूप्रसाद ‘क्लीन शेव्हड्’ होते, उद्धव ठाकरेंचा तेजस्वी यादवला टोला

By admin | Published: July 13, 2017 08:13 AM2017-07-13T08:13:50+5:302017-07-13T08:17:54+5:30

आपल्याला मिसरूडही फुटलेले नव्हते, त्या वयात भ्रष्टाचार कसा करेन असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलं होतं

Lalu Prasad was clean-shaven at the time of fodder scam, Uddhav Thackeray's brilliant memory | चारा घोटाळ्यावेळी लालूप्रसाद ‘क्लीन शेव्हड्’ होते, उद्धव ठाकरेंचा तेजस्वी यादवला टोला

चारा घोटाळ्यावेळी लालूप्रसाद ‘क्लीन शेव्हड्’ होते, उद्धव ठाकरेंचा तेजस्वी यादवला टोला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - बिहारमध्ये सध्या यादव कुटुंबावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजकारण तापले आहे. तेजस्वी यादव यांच्यासह संपुर्ण कुटुंबच सीबीआयच्या कचाट्यात सापडलं असून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आपल्याला मिसरूडही फुटलेले नव्हते, त्या वयात भ्रष्टाचार कसा करेन असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलं होतं. यावर टोला लगावताना उद्धव ठाकरे यांनी चारा घोटाळा उघड झाला तेव्हाही लालूप्रसाद हे ‘मिशाधारी’ नव्हतेच. तेव्हादेखील ते ‘क्लीन शेव्हड्’ होते असं सांगितलं आहे. 
 
आणखी वाचा
मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवांचा मोदी सरकारला प्रश्न
लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा
लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव
 
मिशा आणि भ्रष्टाचार यांचा काय संबंध? मात्र लालूपुत्र आणि बिहारचे तरुण उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यांनी तो जोडला आहे. तेजस्वी प्रसाद यांच्यासह संपूर्ण लालू यादव परिवारच सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयच्या कचाटय़ात सापडला आहे. लालूपुत्र तेजस्वी आणि मुलगी मिसा भारती यांच्याही विरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. ‘हे सर्व आरोप २००४ मधील आहेत. त्यावेळी मला मिशाही नव्हत्या. त्यामुळे मी भ्रष्टाचार कसा करेन’, असा ‘तेजस्वी’ सवाल या लालूपुत्राने केंद्र सरकारला केला आहे. थोडक्यात, आपण त्यावेळी १२-१३ वर्षांचे होतो. आपल्याला मिसरूडही फुटलेले नव्हते. साहजिकच त्या वयात भ्रष्टाचाराची ‘अक्कल’ कशी असणार, असे तेजस्वी यादव यांना म्हणावयाचे असावे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
त्यांचा हा सवाल वरकरणी बिनतोड आहे, पण मिशा असलेले भ्रष्टाचारी आणि मिशा नसलेले ‘स्वच्छ’ हे त्यांचे समीकरण त्यांच्याच वडिलांनाही लागू होणारे नाही. अगदी चारा घोटाळा उघड झाला तेव्हाही लालूप्रसाद हे ‘मिशाधारी’ नव्हतेच. तेव्हादेखील ते ‘क्लीन शेव्हड्’ होते. आताही ते तसेच आहेत. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांच्याविरुद्ध पुन्हा सीबीआयचा ससेमिरा लागलाच आहे ना! असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
लालू यादव यांची सर्वसाधारण प्रतिमा ‘भ्रष्ट’ अशीच आहे. याउलट ज्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये तेजस्वी उपमुख्यमंत्री आहेत त्या नितीशबाबूंचे ‘कोरीव दाढी’ हे वैशिष्टय़ आहे. मात्र त्यांची प्रतिमा ‘स्वच्छ राजकारणी’ अशी आहे. त्यांच्यावर पूर्वीपासूनच कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. म्हणजे तेजस्वी यादव यांच्या ‘मिशा आणि भ्रष्टाचार’ या समीकरणात ना लालू बसतात ना नितीशकुमार. खुद्द तेजस्वी यांनीही आता कोरीव दाढी आणि मिशी ठेवलेली दिसते. मग २००४ मध्ये मिशा नव्हत्या म्हणून स्वतःला ‘स्वच्छ’ म्हणणाऱ्या तेजस्वी यांच्याबद्दल बिहारमधील सामान्य जनतेने आता काय समजायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

Web Title: Lalu Prasad was clean-shaven at the time of fodder scam, Uddhav Thackeray's brilliant memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.