लावणी कार्यक्रमामध्ये वाढला गुंडांचा ‘तमाशा’
By Admin | Published: August 2, 2016 01:04 AM2016-08-02T01:04:33+5:302016-08-02T01:04:33+5:30
लावणी ही महाराष्ट्राची लोकपरंपरा. ही कला जिवंत ठेवण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
पुणे : लावणी ही महाराष्ट्राची लोकपरंपरा. ही कला जिवंत ठेवण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दादागिरी होणे, तिकीट न काढता रंगमंदिरात प्रवेश करणे, प्रेक्षक तसेच कलाकारांना दमदाटी करून रंगमंदिरात दारू पिऊन धिंगाणा घालणे, नाचणे, महिला प्रेक्षकांकडे पाहून अश्लील चाळे करून दहशत माजविणे अशा घटना घडत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे सांस्कृतिक आणि कलेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला गालबोट लागत आहे. ही गुंडगिरी प्रवृत्ती रोखण्यासाठी पारंपरिक लोककला, लावणी निर्माता व कलावंत संघानेच आता कंबर कसली आहे. संघानेच याविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, लोकांवर वचक राहण्यासाठी त्याची प्रतच रंगमंदिराच्या बाहेर लावण्यात आली आहे.
बालगंधर्व हे कलासंस्कृतीचे आगर मानले जाते. ग्रामीण भागाबरोबरच पुण्यासारख्या मध्यवस्ती भागातील या रंगमंदिरात गेल्या काही वर्षांपासून लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध कामांसाठी जिल्ह्यातून आलेला शेतकरी आणि ग्रामीणवर्ग या महोत्सवाचा हक्काचा प्रेक्षक असल्याने या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे आजवरचे चित्र आहे. शिट्ट्या वाजवणे, नाचणे हे प्रकार गृहीतच असल्याने आयोजकांकडून नृत्यांगनांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकवर्गाची हुल्लडबाजी आयोजकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कार्यक्रमाला प्रेक्षकांना तिकीट दाखवूनच आत जावे लागते. मात्र, ‘हम करे सो कायदा’ या आविर्भावात गुंड लोकांकडून दादागिरी करून तिकीट न काढताच बालगंधर्वामध्ये प्रवेश करून धिंगाणा घालत आहेत.
हा लावणी महोत्सव महिला आणि पुरुष दोघांसाठी खुला असल्याने महिलादेखील आवर्जून कार्यक्रमाला हजेरी लावतात. मात्र, दारू पिऊन धिंगाणा घालणे, नाचणे आणि विशेषत: महिला प्रेक्षकांकडे पाहून अश्लील चाळे करून दहशत माजवली जात आहे. या कृत्यामुळे प्रेक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. महिलांचे लावणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाच ते सहा नव्हे, तर पंधरा-वीस गुंडांच्या दहशतीमुळे नृत्यांगनाची सुरक्षितता करणार तरी कशी? हाच आमच्यापुढचा प्रश्न आहे.
हे गुंड थेट व्यासपीठावरच जाऊन नाचत असल्याने त्यांना अडवणार तरी कसे? असा सवाल उपस्थित करीत संघाचे खजिनदार वरुण कांबळे यांनी या प्रकारांना आळा बसण्यासाठी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, कार्यक्रमांमध्ये धिंगाणा घालणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी या तक्रारीची प्रतच रंगमंदिरामध्ये लावण्यात आली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>पोलिसांच्या पहाऱ्यात लावणी महोत्सव
ऐन आखाडात बालगंधर्व रंगमंदिरात दोन दिवसीय लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी कार्यक्रमाला काहीसा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र मंगळवारी (२ आॅगस्ट) गर्दी होण्याची शक्यता अधिक असल्याने दारू पिऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता रंगमंदिराच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार असून, पोलिसांच्या पहाऱ्यातच महोत्सव साजरा होणार आहे.
>सुरक्षिततेसाठी हवेत ‘बाऊन्सर्स’
गर्दीच्या ठिकाणी सिनेकलावंताच्या सुरक्षिततेसाठी जसे बाऊन्सर्स नेमले जातात, तसेच बाऊन्सर्स लावणी महोत्सवातही असण्याची गरज संघाकडून व्यक्त करण्यात आली. प्रेक्षकांकडून व्हिडिओ शूटिंग कार्यक्रमामध्ये नृत्यांगनांचे शृंगारिक भाव आणि मादक नृत्य मोबाईलमध्ये बंदिस्त करण्यासाठी प्रेक्षकांकडून त्यांचे सर्रासपणे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर बंदी घालणेच अधिक फायदेशीर ठरणार आहे.
शिट्ट्या वाजवणे, नाचणे हे प्रकार गृहीतच असल्याने आयोजकांकडून नृत्यांगनांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकवर्गाची हुल्लडबाजी आयोजकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.