राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आरोंदा आंदोलकांवर लाठीमार
By admin | Published: January 8, 2015 01:44 AM2015-01-08T01:44:18+5:302015-01-08T01:44:18+5:30
ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे,
कुडाळ : ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीप्रकरणी बुधवारी नाव न घेता मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला.
आरोंदा येथील आंदोलनकर्ते ग्रामस्थ, महिला यांच्यावर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या कंपनीच्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसून, जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही कुडाळ येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी दिला. जेटी बांधत असताना येथील गणपती विसर्जनाचा, येण्या-जाण्याचा मार्ग बंद होत असेल, स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असेल, राज्य रस्ता बंद करण्यात येत असेल, येथील बोटी नेण्याकरिता पाण्यातील खडक फोडल्याने पुराची स्थिती भविष्यात उद्भवत असेल, तर जनतेने छेडलेले आंदोलन योग्य आहे. त्यामुळे आपण जनतेच्या पाठीशी आहोत.
कलमात खाडाखोड करून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना अटक करण्यात आली व हे येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. मते देणाऱ्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचेही काम त्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.