मुंबई-नागपूर महामार्गाचे भूसंपादन
By admin | Published: August 13, 2016 03:06 AM2016-08-13T03:06:11+5:302016-08-13T03:06:11+5:30
मुंबई-नागपूर या ७५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावीत राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्यात
औरंगाबाद : मुंबई-नागपूर या ७५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावीत राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्यात आला असून, ४ महिन्यांत त्यासाठी भूसंपादन करण्याचे आदेश ११ जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना शुक्रवारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिले.
भूसंपादनाच्या ४७२ कलमानुसार नोटिफिकेशन जारी झाले असून शुक्रवारपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादनासाठी रोख मोबदला, लॅण्ड पुलिंग सिस्टीम आणि भागीदारी, असे तीन पर्याय ५ जुलैच्या आदेशात असून, भूमालकांच्या सहमतीने संपादन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोपलवार म्हणाले, या महामार्गावर २१ टाऊनशिप होतील. मराठवाडा समृद्धीचा हा महामार्ग १५० किलोमीटर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून जाणार असून, त्या मार्गावर ४ टाऊनशिप होतील. ३२ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. हा मार्ग होणारच यात कुठलीही शंका नाही. भूसंपादनासाठी कुठलीही जबरदस्ती राहणार नाही. ४१० कि़ मी. च्या पट्ट्यात कोरडवाहू जमीन आहे. नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये विरोध नाही. बुलडाण्यात काही ठिकाणी शंका आहेत. नाशिकमध्ये बागायती जमिनीमुळे थोडी अडचण आहे. भूसंपादनासाठी दीड वर्षाचा नियम जरी असला तरी ४ महिन्यांत संपादन व्हावे, असे ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
काय आहे आंध्र पॅटर्न
आंध्रच्या भूसंपादन पॅटर्ननुसार शेतजमीन मालकांना संपादित जमिनीच्या २५ टक्के बिगरकृषी जमीन दिली जाते. तसेच जिरायती (कोरडवाहू) जमीन संपादित झाली असेल, तर वर्षाकाठी ३० हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी वार्षिक ५० हजार रुपये दिले जातात.
- नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेडराजा-जालना- शेंद्रा-औरंगाबाद-सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव मोर-घोटी/देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल.