राष्ट्रीय रस्त्यांच्या कामांसाठी पोलीस बंदोबस्तात भूसंपादन करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 02:04 PM2020-01-10T14:04:37+5:302020-01-10T14:10:39+5:30
जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश
पुणे : पुणे विभागात सध्या खेड-सिन्नर, पुणे-सातारा, संत तुकाराम पालखीमार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, सांगली व सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी-नागपूर महामार्ग या रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु केवळ वेळेत भूसंपादन न झाल्याने व कायदेशीर बाबीमुळे रस्त्यांची कामे अनेक वर्षे रखडली आहेत. विभागात किती ठिकाणी भूसंपादनामुळे कामे रखडली याचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांनी संबंधित सर्व अधिकाºयांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्गांच्या रखडलेल्या भूसंपादनासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात शर्मा यांनी आढावा बैठक घेतील. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, एनएचएआयचे राजीव सिंह उपस्थित होते.
आशिष शर्मा म्हणाले, पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गांची कामे सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी कामे रखडली आहेत. ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत. त्याठिकाणी भूसंपादनाचे विषय प्रलंबित असतील तर ते तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, त्या ठिकाणी काही अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे.
विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह महामार्गाच्या कामांना गती येण्यासाठी जमिनीच्या भूसंपादनाची कामे प्राध्यान्याने करावीत, यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व महसुलच्या भूसंपादन शाखेने समन्वयाने काम करा, असे शर्मा यांनी सांगितले.
....
खेड-शिवापूर टोल नाक्याचा प्रश्न त्वरित सोडवा
पुणे-सातारा महामार्गाचे काम देखील गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. खेड-शिवापूर
टोल नाक्यावर व परिसरात होणाºया नियमितच्या वाहनकोंडीची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
2या टोलनाक्यावर वाहनांच्या टोल आकारणीचे योग्य नियोजन होत नसल्याने हा प्रश्न उद्भवत असून, एनएचएआयच्या अधिकाºयांनी तातडीने लक्ष घालून हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देखील संबंधित अधिकाºयांना दिले.
.........
पालिकेने पैसे जमा केल्यास चांदणी चौकासाठी त्वरित भूसंपादन
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चांदणी चौक उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या ३७ मिळकतीचे २ हेक्टर ९४ आर क्षेत्राचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका प्रशासनाला पाठविला आहे. यासाठी आवश्यक असणारी ३० टक्के रक्कम महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
...........
महामार्गाच्या अर्धवट कामांसाठी १६० कोटींचा निधी
पुणे-सातारा महामार्गांची अद्यापी अनेक कामे अर्धवट आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्नदेखील अत्यंत गंभीर झाला असून, रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामे त्वरित पूर्ण करावी व टोल नाका बंद करण्याची मागणी शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या वतीने एनएचएआयचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांच्याकडे केली. यावेळी शर्मा यांनी महामार्गांची अर्धवट राहिलेल्या कामासाठी तब्बल १६० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करणार असून, सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समितीचे ज्ञानेश्वर दारवटकर यांनी पत्रकाद्वारे कळवले.