समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस लवकरच होणार प्रारंभ!
By admin | Published: April 6, 2017 12:47 AM2017-04-06T00:47:42+5:302017-04-06T00:47:42+5:30
वाशिम- महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांनी मंजूरी देताच भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये जमीन मोजणी, दगड रोवणीची कामे आटोपली!
सुनील काकडे - वाशिम
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे वाशिम जिल्ह्यातील काम जलदगतीने सुरु असून जमीन मोजणी, पिल्लर फिक्सींग पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांनी मंजूरी देताच भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
विकासाचा मार्ग म्हणून गणल्या गेलेला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे अर्थात समृद्धी महामार्ग निर्मितीच्या प्रक्रियेने सद्या वेग घेतला आहे. या महामार्गासाठी एकंदरित १५०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यानुषंगाने ४ तालुक्यांमधील ५४ गावांमध्ये जमीन मोजणी आणि दगड रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांकडे पाठविला जाणार आहे.
भूसंपादनाला भूसंचय पद्धतीचा प्रभावी पर्याय!
समृद्धी महामार्गासाठी लागणारी जमीन सरळ भावाने खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. परंतू जे शेतकरी यासाठी तयार नाहीत, त्यांच्याकरिता शासनाने भुसंचय पद्धतदेखील अंमलात आणली आहे. अशा पद्धतीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतीवर्ष मोबदला दिला जाणार असून बागायती जमीनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय १० वर्षापर्यंत प्रतीवर्ष या रकमेत १० टक्के वाढ केली जाणार आहे. याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना कृषी समृद्धी केंद्रात २५ टक्के विकसीत भूखंड दिला जाणार असून त्यास पर्याय म्हणून नजीकच्या जिल्ह्यांमध्येही विकसीत भूखंड देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
शासनाने समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला असून त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी देखील विविध स्वरूपातील फायदेशीर योजना आखल्या आहेत. त्यामुळे महामार्ग निर्मितीनंतर शेतकरी खऱ्याअर्थाने समृद्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध न करता प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम