समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन सुरू

By admin | Published: July 14, 2017 05:00 AM2017-07-14T05:00:05+5:302017-07-14T05:00:05+5:30

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला

Land acquisition for the prosperity highway continues | समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन सुरू

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या थेट खरेदीला सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली. सहा शेतकऱ्यांच्या जमिनी यावेळी खरेदी करण्यात आल्या.
शिंदे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. या महामार्गामुळे राज्यासह शेतकऱ्यांनादेखील समृद्धी येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीही अडचणी असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ हजार कोटींचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे कार्य सुरू आहे. जमीन खरेदीचा ऐतिहासिक टप्पा हिंगणा तहसील कार्यालयात शेतकरी व मंत्र्यांच्या संवादाने सुरू झाला.
पहिल्या काही खरेदीखतांवर साक्षीदार एकनाथ शिंदे आणि ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी १२० शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यासाठी इरादापत्रेही दिली.
शासनाने या प्रकल्पासाठी जमिनीला आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले असून, रेडी रेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जे जास्त असेल, त्याच्या पाचपट रक्कम मोबदला म्हणून मिळणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
>उद्धव ठाकरेंच्या निर्देशांचे पालन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
>राम आसरे शाहूंच्या नावे पहिले खरेदीपत्र
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या हिंगणा तालुक्यातील २७९ शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता असून कार्यक्रमाच्या वेळी सहा शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले. ६ शेतकऱ्यांच्या ५.५९ हेक्टर जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले व २ कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला बँक खात्यात ‘आरटीजीएस’ने जमा होणार आहे. राम आसरे शाहू हे या प्रकल्पासाठी जमीन देणारे पहिले शेतकरी ठरल. त्यांच्या सव्वा हेक्टर जमिनीची शासनाने ५९ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केली. याशिवाय चंद्रा गायकवाड, सत्यभामा सोनारकर, मंदा फुलझेले, गोपाल मिसाळ-कल्पना मिसाळ यांची शेतजमिनीदेखील खरेदी करण्यात आली.
>सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भूसंपादनाच्या खरेदीपत्रावर स्वाक्षरी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Land acquisition for the prosperity highway continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.