भूविकास बँक अखेर अवसायनात
By admin | Published: November 28, 2015 12:43 AM2015-11-28T00:43:34+5:302015-11-28T00:44:01+5:30
जिल्हा उपनिबंधकांचे आदेश : कर्मचाऱ्यांच्या पंधरा वर्षांच्या संघर्षाला आले अपयश
राजाराम लोंढे -- कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास) अखेर अवसायनात काढली. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले. अवसायक म्हणून शहर उपनिबंधक एस. व्ही. निकम यांची नियुक्ती केली. ‘भूविकास’ बँक वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गेली पंधरा वर्षे संघर्ष केला, पण त्यांच्या पदरी अपयश आले.
शेतकऱ्यांना पाणीपुरवठा योजना, दूध व्यवसायासह शेती औजारांसाठी दीर्घ व अल्पदराने कर्ज पुरवठा ‘भूविकास’ बॅँकेने केला. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती होऊ शकली, हे नाकारता येणार नाही; पण १९९७ ला युती सरकारने ‘भूविकास’ची थकहमी नाकारली आणि तेथून या बँकेची अधोगती सुरू झाली.
कर्मचारी व शेतकऱ्यांनी ‘भूविकास’ पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारकडे रेटा लावला. आघाडी सरकारने बँक सुरू करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या, त्यांच्या अहवालावर निर्णय घेतला नसल्याने अहवाल अक्षरश: धूळ खात पडले. आघाडी सरकारच्या काळात बँका सुरू झाल्या पाहिजेत, म्हणून रस्त्यावर उतरणारे नेते सत्तेत आले; त्यामुळे बँका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना कर्मचाऱ्यांची झाली; पण हे सरकार सत्तेवर आल्यानंतर यांनीही पुन्हा समिती नेमली. त्रिसदस्यीय समितीने कोल्हापूर व अहमदनगरवगळता इतर बँका बंद करण्याचा निर्णय एप्रिल २०१५ मध्ये घेतला. कोल्हापूर शाखेवर सध्या संचालक मंडळ कार्यरत होते. या शाखेचा निर्णय आर्थिक परिस्थिती पाहून जिल्हा उपनिबंधकांनी घ्यावा, असे आदेश देण्यात आले. गेले सहा महिने आर्थिक स्थितीचा अभ्यास करून बँक अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला.
कर्मचाऱ्यांची धडपड
बॅँक सुरू व्हावी, यासाठी कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक व्ही. एम. मोहिते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गेले सात-आठ वर्षे वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. ‘घंटानाद’ आंदोलन, अशा विविध मार्गांनी वसुली केली. शेतकरी व संस्थांकडून ठेवी गोळा करून बँक पुन्हा सक्षमपणे चालविण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली होती; पण सरकारची या बँकेकडे बघण्याची मानसिकताच वेगळी असल्याने अखेर बँकेला कुलूप लागले.
भूविकास बॅँकेचा अवसायक म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. अवसायनातील पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. - एस. व्ही. निकम,
अवसायक, भूविकास बॅँक