बाधितांना जमिनी परत कराव्यात
By Admin | Published: May 18, 2016 02:10 AM2016-05-18T02:10:18+5:302016-05-18T02:10:18+5:30
पुणे - मुंबई एक्सप्रेस वे मार्गासाठी विनावापर पडून असलेल्या जमिनी परत कराव्यात
उर्से : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे मार्गासाठी विनावापर पडून असलेल्या जमिनी परत कराव्यात. आतापर्यंतचे जमिनीचे भाडे अदा करावे. संपूर्ण जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचे पुनवर्सन करावे, या मागण्या बाधित शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शरद पाटील यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी कृषी बाजार समितीचे संचालक सुभाष धामणकर, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, नीलेश मुऱ्हे ,प्रवीण गोपाळे, कचरु पारखी, एकनाथ आंबेकर, पांडुरंग घारे, जालिंधर धामणकर, जयसिंग ठाकूर, प्रवीण गोपाळे, रामदास सुतार, चंद्रकांत सुतार, मारुती वाळुंजकर, चिंधू म्हस्के, इंद्रजीत वाळुंजकर, उद्धव कारके, बबन धामणकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचा आत्तापर्यंत विचार केला नाही. या संदर्भात कार्यवाही केली जावी, या मागणीसाठी नुकतीच १७ गावांतील ग्रामस्थांची सहविचार सभा उर्से येथे झाली. सभेत केलेल्या मागणीचे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले.
बाधित शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी व उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडी) दिले होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. श्रीमंत व्यावसायिक आणि ठेकेदारांना व्यवसायासाठी जागा देण्यात
आली.
यामुळे बाधितांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना सद्य:स्थितीतील जमिनीचा भाव मिळावा. नोकरी आणि व्यवसायासाठी प्राधान्य द्यावे. सर्व्हिस रस्ता उपलब्ध करून द्यावा. आवश्यक नसलेल्या संपादित जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात.
उर्से खिंडीतील दरडीबाबत योग्य कार्यवाही करून ती दुरस्ती करावी. मार्गावरील टोल स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांना माफ करावी. सदर टोल नाक्याला दिलेले नाव बदलून उर्से टोल नाका असे दुरुस्त करून घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)