‘एम्स’साठी जमिनीचे हस्तांतरण

By admin | Published: July 14, 2015 12:56 AM2015-07-14T00:56:21+5:302015-07-14T00:56:21+5:30

मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा

Land transfer for 'AIIMS' | ‘एम्स’साठी जमिनीचे हस्तांतरण

‘एम्स’साठी जमिनीचे हस्तांतरण

Next

- सुमेध वाघमारे/राजीव सिंग,  नागपूर
मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ला (एचएससीसी) हस्तांतरित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला प्रस्तावित जागेवर पाणी, वीज व चौपदरी रस्ता उपलब्ध करून द्यायचे आहे.
२०१४-१५च्या अर्थसंकल्पात देशात चार नवीन ‘एम्स’ उभारण्याच्या निर्णयानंतर लगेचच केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये ‘एम्स’ नागपुरात होत असल्याची घोषणा केली. सुरुवातीला हा प्रकल्प मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची अशी एकूण साधारण २०० एकर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित होते. परंतु तेथील विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. त्यामुळे ‘एम्स’च्या अभ्यासमंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला. मिहान आणि टीबी वॉर्ड अशा दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला होता.
मे महिन्यात मुंबईमध्ये ‘एम्स’ व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात मिहानमधील ‘सेझ’ बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याआधारे ‘एम्स’साठी १५० एकर जागा राखीव ठेवण्यात आली. पूर्वी ही जागा गोल्फ कोर्ससाठी राखीव ठेवण्यात आली होती.

वीज उलब्धतेसाठी देणार पत्र : एचएससीसीकडे जागा हस्तांतरण करण्यापूर्वी वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याचे केंद्र सचिवांचे निर्देश आहे. त्यानुसार प्रस्तावित जागेवर पाणी व चौपदरी रस्ता आहे गरज आहे फक्त ती विजेची. या संदर्भात लवकरच विद्युत महामंडळाला पत्र दिले जाणार आहे.
५० एकरांचा घोळ : प्रकल्पासाठी आणखी आवश्यक असलेल्या ५० एकरच्या जागेचा घोळ अद्यापही सुटलेला नाही. ‘एमएडीसी’नुसार ‘एम्स’चे एक युनिट मेडिकलच्या टीबी वॉर्डातील ५० एकर जागेवर होईल, तर ‘सेझ’मध्येच ही जागा उपलब्ध करून देण्याला तांत्रिक मंजुरी मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एचएससीसी करणार बांधकाम
एम्स निर्माणाची मुख्य कार्यदायी संस्था, एचएससीसी ही केंद्राच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत काम करते. नागपूरच्या एम्सच्या बांधकामाची जबाबदारीही याच संस्थेकडे राहणार आहे. यामुळे एम्सची प्रस्तावित जागा या संस्थेकडे हस्तांतरित करा, असे निर्देश केंद्रीय सचिवांकडून गेल्या आठवड्यात प्राप्त झाल्याची माहिती आहे.

मिहानमधील गोल्फ कोर्ससाठी आरक्षित असलेली १५० एकरची जागा ‘एम्स’साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमिनीच्या हस्तांतरणाच्या संदर्भात एचएससीसी इंडिया लिमिटेडचे पथक लवकरच नागपुरात येणार आहे.
- एस.व्ही, चहांदे,
मुख्य अभियंता, एमएडीसी
‘एचएससीसी’ला जागा हस्तांतरण करण्याच्या केंद्र सचिवांच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रस्तावित जागेवर पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध आहे. आवश्यक विजेसाठी लवकरच विद्युत महामंडळाला पत्र देण्यात येणार आहे.
- डॉ. प्रकाश वाकोडे,
नोडल अधिकारी, एम्स

Web Title: Land transfer for 'AIIMS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.