भूमिहीन मजुरांनीही घेतली शहराकडे धाव
By admin | Published: May 17, 2016 03:40 AM2016-05-17T03:40:47+5:302016-05-17T03:40:47+5:30
राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली आहे. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या राज्याच्या पोशिंद्यावर आत्महत्येची वेळ आली असून दुसऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांनी कसे घर चालवायचे, असा प्रश्न समोर उभा राहिल्याची प्रतिक्रिया विदर्भातील किशोर पवार यांनी दिली. गावाकडे उपासमारीची वेळ आल्याने कुटुंबासोबत नवी मुंबई स्थलांतर केलेल्या पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय करीत असून, कसाबसा संसाराचा गाडा ओढत असल्याचे सांगितले.
बेलापूर परिसरातही २०हून अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली असून, दुष्काळाची झळ सोसणे मुश्कील झाल्याने गाव सोडून शहराची वाट धरली आहे. या कुटुंबीयांनी आपल्या चिमुकल्यांबरोबर ठिकठिकाणी उघड्यावर संसार थाटला असून, शहरातही अनेक समस्यांशी झुंजावे लागत असल्याची प्रतिक्रिया या स्थलांतरित कुटुंबीयांनी व्यक्त केली. अनेकवेळा लाठीमार करून उठविले जात असून, मग आम्ही राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. आम्ही झोपड्या बांधून राहत नाही, पण जिथे झोपण्यापुरता जागा मिळेल तिथे आम्ही आमच्या कुटुंबाची सोय करतो; तरीदेखील आम्हाला प्रत्येक परिसरातून हाकलण्यात येथे. शहरातील नागरिक तसेच तिथल्या प्रशासनाला आम्हाला कसलाही त्रास द्यायचा नसतो, पण आम्हाला एखादी जागा मिळवून दिली दर पावसाळ्यापर्यंत तरी आमच्या पोराबाळांना उघड्यावर राहावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या जयहिंद पवार यांनी व्यक्त केली. बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशी कामे करून शहरात रोजगार मिळवतो, परंतु रोजच्या रोज हाताला काम मिळत नसल्याने कुटुंबाची उपासमार होते. महागाई वाढल्याने दोन वेळची भूक भागविण्यासाठीही दिवसभर कामधंदा शोधत फिरावे लागते. दारोदारी जाऊन पाणी मागून तहान भागवावी लागते.
तरुणांना भेडसावतेय रोजगाराची समस्या
यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यातील तरुणही नवी मुंबईत स्थलांतरीत झाले असून, शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पदवीचा अभ्यास घेतलेल्या तरुणांनाही या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये काम करावे लागत असल्याने पोराला शिकवून काय फायदा, असाही प्रश्न येथील पवार कुटुंबीयांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. शासनाने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी या तरुणांनी केली आहे.
तान्ही मुलं घेऊन शहराकडे धाव घेतली, पण इथही आमचे हाल होत आहेत. उघड्यावर राहिल्याने मुलांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. उपचारासाठी पैसे नसल्याने आमच्याबरोबर या लेकरांचीही फरफट होत असल्याचे अमरावती येथून आलेल्या सरिता पवार यांनी व्यक्त केली आहे. मुलाला असलेल्या आजारावर डॉक्टरांनी आॅपरेशन हा एकमेव पर्याय सांगितला असून, पैशाअभावी उपचार करता येत नसल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.