काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?
By प्रविण मरगळे | Published: July 20, 2023 12:22 PM2023-07-20T12:22:06+5:302023-07-20T12:23:45+5:30
इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले.
प्रविण मरगळे
रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक लोक जिवंत ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सततचा कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे कुणी घराबाहेर नव्हते. रात्री जेवल्यानंतर झोपी गेलेल्या या लोकांवर आस्मानी संकट कोसळले अन् होत्याचे नव्हते झाले. इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेनंतर तात्काळ प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तिथे पोहचले. मदतकार्यासाठी बचाव पथके दाखल खाली. सर्व यंत्रणा दुर्घटनेतील लोकांचा शोध घेऊ लागलेत. यातून काही लोक सुखरुप बचावले आहेत. परंतु, अद्यापही अनेक लोकांचा ठावठिकाणा लागत नाही.
इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले. जवळपास संपूर्ण गावच क्षणार्धात गायब झाले. ३० जुलै २०१४ च्या या घटनेत ४४ घरे मातीत गाडली. थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटनेत १५१ लोकांचा मृत्यू झाला. आजही ही दुर्घटना आठवून अनेकांचे डोळे पाणावतात. २०२१ मध्ये रायगडच्या महाड येथील तळीये गावातही अशीच दुर्घटना घडली. पावसामुळे घरांवर दरड कोसळली. ४० हून अधिक लोक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. कोकणात दरवर्षी इतर विभागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडतात. इर्शाळवाडी, माळीण, तळीये यासारख्या अनेक घटना राज्यात याआधीही घडल्या आहेत. पण तात्पुरता मुलामा लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, राज्यकर्ते पीडितांच्या मदतीसाठी धावतात. परंतु ज्यानं आपला बाप, आई, भाऊ आणि जीवाभावाची माणसं गमावली त्यांच्या नशिबी केवळ डोळ्यातील अश्रू येतात.
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर आता खरेच विचारावे वाटते की, अजून किती बळी गेल्यावर आपल्या व्यवस्थेला, प्रशासनाला, राज्यकर्त्यांना जाग येणार? पिढ्यानपिढ्या लोक गावात राहतात. परंतु, निसर्गाला धक्का लावून, निसर्गनियमाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी केल्याने अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडतायेत. इर्शाळवाडीतील दुर्घटना पाहून राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील का हा खरा प्रश्न आहे. इर्शाळवाडीत ज्याभागात दरड कोसळली तो भाग डोंगराच्या उच्च माथ्यावर आहे. त्याठिकाणी कुठलेही वाहन पोहचू शकत नाही. १ ते दीड तास दुर्घटनास्थळी पोहचण्यासाठी लागतात. त्यामुळे याठिकाणी बचावपथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जेसीबी अन्य मशिन मदतीसाठी पाठवता येत नाही. हेलिकॉप्टरने मदत पोहचवायची झाल्यास आजही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. सोयीसुविधा नाही.
२०१८ मध्ये मी सिंधुदुर्गातील करूळ-केगदवाडी, अर्चिणे, द्रोणावाडी, शिराळा यासारख्या गावात गेलो होतो. त्याठिकाणी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. रस्ता नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. आजारपणात तर उपचारासाठी कित्येक मैल पायपीट करत दवाखाना गाठावा लागतो. आज भलेही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देश साजरा करत असेल तरी अनेक गावांची परिस्थिती आजही बिकट आहे. एकीकडे आधुनिकतेच्या दिशेने भारत पुढे जातोय, चंद्रावर पोहोचण्यासाठीही मोहीम आखली जातेय. परंतु दुसरीकडे डोंगरदऱ्यातील गावांमध्ये आजही रस्ते नाहीत, पाणी नाहीत. कुठल्याही सोयी नाहीत असे विदारक चित्र दिसून येते.
आज इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पीडितांचा आक्रोश पाहून मन हेलावले. लहान लहान लेकरेही मातीत गाडली गेली. यातील किती माणसे जिवंत बाहेर येतील हे सांगणे कठीण आहे. परंतु, या निमित्ताने डोंगरात राहणाऱ्या माणसांचा विचार राज्यकर्ते करतील का हा प्रश्न आहे. दुर्घटना घडतात, प्रशासन जागे होते, राज्यकर्ते विचारपूस करतात पण यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. लोकशाहीत प्रत्येक मत गरजेचे असते, मात्र इथं हजारो मते ढिगाऱ्याखाली जिवंत गाडली जात आहेत. राज्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या माणसांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. नाहीतर काल माळीण, तळीये होते, आज इर्शाळवाडी आहे अन् उद्या अन्य कुठलं तरी गाव असेल....आपण केवळ आदरांजली देण्याचं काम करत राहू.