सिडको कार्यालयातून लॅपटॉप लंपास
By admin | Published: September 10, 2015 02:41 AM2015-09-10T02:41:03+5:302015-09-10T02:41:03+5:30
राज्यातले आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ असलेल्या सिडको कार्यालयात मंगळवारी मध्यरात्री चोरी झाली. त्यामध्ये ५ हजार रुपयांची रक्कम व तीन लॅपटॉप चोरीला गेले आहेत.
नवी मुंबई : राज्यातले आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ असलेल्या सिडको कार्यालयात मंगळवारी मध्यरात्री चोरी झाली. त्यामध्ये ५ हजार रुपयांची रक्कम व तीन लॅपटॉप चोरीला गेले आहेत. या चोरट्याने सिडको इमारतीमधील तीन मजल्यांवरील कार्यालयांमध्ये चोरीचा प्रयत्न केला आहे.
मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असलेल्या सिडको कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दिवसा चोख बंदोबस्त असणारे सिडकोचे कार्यालय रात्री मात्र रामभरोसे असल्याचे एकट्या चोरट्याने उघड करून दिले आहे. सिडको भवनमधील नूतनीकरण सुरू असलेल्या कँटीनच्या खिडकीतून हा चोर घुसला. त्याने कँटीनच्या गल्ल्यातील ५ हजार रुपये चोरले. यानंतर लगतच्याच संगणक विभागाचा दरवाजा तोडून आतमधील तीन लॅपटॉप चोरले. हे अधिकाऱ्यांचे खासगी लॅपटॉप आहेत. यानंतर हा चोरटा थेट सिडको कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोचला. त्याठिकाणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालिका, मुख्य दक्षता अधिकारी व जनसंपर्क अधिकाऱ्यांची दालने आहेत. रात्री कार्यालय वाऱ्यावर असल्याचे हेरून चोरट्याने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने हत्याराने दरवाजाचे लॉक तोडण्याचाही प्रयत्न केला. परंतु अपयश आल्याने हा चोरटा थेट पाचव्या मजल्यावर गेला. तिथे अकाऊंट विभागात घुसून तिथेही चोरी करण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. अखेर काही केल्या दरवाजा न उघडल्याने हाती लागले त्यातच समाधान मानत हा चोरटा आल्यामार्गे परत गेला. (प्रतिनिधी)
-बुधवारी सकाळी सिडको भवनमध्ये अधिकाऱ्यांची हजेरी लागताच चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानुसार या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-हा चोरटा एकटाच असून, तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले.