ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट?

By admin | Published: December 24, 2015 12:10 AM2015-12-24T00:10:37+5:302015-12-24T00:28:12+5:30

गोव्याशी कनेक्शन : दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग

Large racket behind drugs? | ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट?

ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट?

Next

वैभव साळकर- दोडामार्ग --केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री दोडामार्गमध्ये अमली पदार्थ विक्री विरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे दोडामार्ग तालुक्याचे गोवा राज्याशी चर्चेत असलेले ड्रग्स कनेक्शन उघड झाले आहे. यापूर्वी गांजासारख्या अमली पदार्थांची लागवड तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर आढळून आल्याने ड्रग्स माफियांच्या कारवायांमुळे दोडामार्ग तालुका चर्चेत होता. मात्र, आता गांजासोबत रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या ड्रग्सचाही पुरवठा तालुक्यातून होत असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, या कारवाईत पकडण्यात आलेले संशयीत हे केवळ प्यादे असून, त्यांचा म्होरक्या मात्र अद्याप मोकाटच आहे. या संपूर्ण प्रकरणात तालुक्यातील काही युवकांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे.गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुका वसला आहे. त्यामुळे या तालुक्याचा बराचसा संपर्क हा गोवा आणि कर्नाटकशी येतो. अनेक व्यवहार या दोन राज्यातील लोकांशी मोठ्या प्रमाणात केले जातात. डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने याठिकाणी गुन्हेगारी कारवाया देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात. या भागात ड्रग्सची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे येत आहे.त्यामुळे दोडामार्ग तालुका हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय अमली पदार्थ विरोधी गोवा विभागीय कार्यालयाच्या पथकाने अमली पदार्थाची विक्री करताना दोघा संशयितांना रंगेहात पकडल्याने पुन्हा एकदा तालुका चर्चेत आला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.अंमली पदार्थाच्या तस्करीवरून दोडामार्ग तालुका यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. साधारण: आठ वर्षांपूर्वी तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर करण्यात आलेली गांजा लागवड पकडून पोलिसांनी त्यावेळी काही परप्रांतीयांना अटक केली होती. तेव्हापासून अमली पदार्थ खरेदी व्यवहाराचे दोडामार्ग तालुका हा केंद्रबिंदू करण्याचा प्रयत्न या अमली पदार्थ खरेदी-विक्रीत गुंतलेल्या लोकांकडून करण्यात येत आहे. तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर आजही परप्रांतीयांकडून गांजासारख्या वनस्पतींची लागवड केली जात असल्याचा आरोप झाला आहे. पण स्थानिक पोलीस मात्र त्याकडे कानाडोळा करत आहेत. गोव्यात कडेकोट बंदोबस्त असल्याने त्याठिकाणी अमली पदार्थ व्यवहार करताना मोठी खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे यात धोका मोठा असतो. मात्र, दोडामार्ग तालुक्यात असे व्यवहार बिनबोभाटपणे करता येतात. परिणामी सुरक्षित ठिकाण म्हणून दोडामार्गकडे गोव्यातील ड्रग्स माफियांचा डोळा आहे. हे काम करण्यासाठी स्थानिक युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम हे माफिया करत आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या कारवाईमधून हे सत्य समोर आले असून, स्थानिक पोलीस प्रशासनाने मात्र आता यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा ड्रग्सचे जाळे आणखीनच वाढत जाणार आहे.



गांजाची लागवड : धडक मोहीम राबवावी
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय?
दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर यापूर्वी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली होती. आजही अशी अमली पदार्थांची लागवड केली जाते, असा आरोप आहे. मात्र, स्थानिक पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. निदान आता तरी दोडामार्ग तालुका ड्रग्ज माफियांसाठी खरेदी-विक्रीचे केंद्र बनू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे आणि धडक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
गोव्याच्या सीमावर्ती भागाला विळखा
गोव्याच्या सीमावर्ती भागात ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची चर्चा आहे. केरी-गोवा, पर्ये त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्याच्या काही भागात हे प्रकार चालतात, अशी जोरदार चर्चा आता सुरू आहे.

Web Title: Large racket behind drugs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.