वंचित विद्यार्थ्यांना अखेर प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2016 02:01 AM2016-08-09T02:01:07+5:302016-08-09T02:01:07+5:30
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज न केलेले विद्यार्थी सुमारे दीड महिन्यापासून प्रवेशापासून वंचित होते.
पुणे : अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज न केलेले विद्यार्थी सुमारे दीड महिन्यापासून प्रवेशापासून वंचित होते. अखेर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या १ हजार ५९० विद्यार्थ्यांपैकी सोमवारी ९७७ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला. उर्वरित विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (दि.९) प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावेत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, प्रवेश अर्ज न भरल्याने व अपूर्ण अर्ज भरल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाचवी प्रवेश फेरी ‘ब’अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमधून १ हजार ५९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यातील ९७७ विद्यार्थ्यांनी सोमवारी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. परंतु, प्रवेश मिळूनही ६११ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशच घेतलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांना येत्या ९ आॅगस्टपर्यंतच संबंधित महाविद्यालायत प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयार्फे कळविण्यात आले आहे.