अकरावीच्या प्रवेशाची शेवटची संधी
By admin | Published: September 26, 2016 02:49 AM2016-09-26T02:49:55+5:302016-09-26T02:49:55+5:30
अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी प्रवेशाची अकरावी फेरी सोमवारपासून सुरू होत आहे.
मुंबई : अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी प्रवेशाची अकरावी फेरी सोमवारपासून सुरू होत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या आणि दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीसाठी अर्ज करता येईल. मात्र, या आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत अर्ज करता येणार नाही.
मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत प्रवेशाच्या १० फेऱ्या पार पडल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणि प्रवेशात बदल करण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपवण्यात येणार आहे. परिणामी, अकरावी आॅनलाइन प्रवेशाची ही शेवटची संधी असेल. आत्तापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या वेळी अर्ज करता येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आॅफलाइन प्रवेशास बंदी असल्याने, प्रवेश फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळेच यापुढे प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कार्यालयाची राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना या फेरीत सामील होण्यासाठी २६ व २७ सप्टेंबरदरम्यान प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरून निश्चित करावा लागेल. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे घोषित होतील, त्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. या फेरीनंतर कोणतीही प्रवेश फेरी होणार नसल्याचे पालक, विद्यार्थी, प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)