‘बदली रद्द’साठी इच्छुक पोलिसांना अखेरची संधी
By admin | Published: July 13, 2015 01:33 AM2015-07-13T01:33:46+5:302015-07-13T01:33:46+5:30
कौटुंबिक, वैद्यकीय कारणामुळे नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास असमर्थ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपली अडचण थेट पोलीस महासंचालक संजीव दयाळ
मुंबई: कौटुंबिक, वैद्यकीय कारणामुळे नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास असमर्थ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपली अडचण थेट पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना सांगण्याची संधी मिळाली आहे. ज्यांच्या समस्या रास्त आहेत त्यांची बदली रद्द होऊन त्यांची सोईच्या ठिकाणी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
उद्या (सोमवारी) व मंगळवारी दोन टप्प्यांत ओआर कक्षात येथे गाऱ्हाणी मांडता येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. या पूर्वी भेटलेल्यांना मात्र यात सहभागी होेता येणार नाही. सुमारे १५०वर अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास अनुत्सुक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरवर्षी मे व जून महिन्यात सुमारे ६०० च्या वर पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (जनरल गॅझेट) झाल्या आहेत. एकच आयुक्तालय / जिल्ह्यात सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्यांच्या त्यात समावेश आहे. यापैकी बहुतांश जण नियुक्तीच्या ठिकाणी हजर असलेतरी अनेक जण वैयक्तिक अडचणींमुळे त्या ठिकाणी गेलेले नाहीत. (प्रतिनिधी)
अनेक जण आजारपणाच्या रजेवर
त्यात प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून विदर्भ व नक्षलग्रस्त भागात बदली झालेल्यांचा समावेश आहे. स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, पाल्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आदी प्रमुख अडचणी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अनेक जण हजर होण्याऐवजी आजारपणाच्या रजेवर गेले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे महासंचालक दयाळ यांनी ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आयुक्तालय व कोकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. तर मंगळवारी औरंगाबाद, अमरावती, नागपूर आयुक्तालये कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, अमरावती परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.