जालन्यात अखेरच्या दिवशी फिरली हवा, पण कुणाच्या बाजुने ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 09:39 AM2019-10-23T09:39:05+5:302019-10-23T09:40:01+5:30
भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई - जालना मतदार संघातील लढत महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची मानली जाते. गेल्यावेळी विजयी उमेदवार शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांच्यातील विजयाचे अंतर 300 मतांच्या आत होते. आता देखील ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी येथील हवा फिरल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.
जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर एकमेकांना आव्हान देत आहेत. यावेळीही अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी प्रचारात जोर लावला. येथील नगर परिषद गोरंट्याल यांच्याकडे आहे. तर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे.
2014 मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवसेना आणि भाजप यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र कैलाश गोरंट्याल दुसऱ्या स्थानी होते. तर राष्ट्रवादीची फारशी ताकत नव्हती. अवघ्या 250 मतांनी खोतकर विजयी झाले होते. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली. त्यामुळे खोतकर यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात येत होते. तसं चित्रही प्रचारात दिसून येत होते.
दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी गोरंट्याल यांनी प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत आघाडी घेतली. काँग्रेसची लहर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.