हा शेवटचा पराभव - राज ठाकरे
By admin | Published: March 10, 2017 02:22 AM2017-03-10T02:22:57+5:302017-03-10T02:22:57+5:30
महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरले. या पराभवाने निवडणुका कशा लढायच्या याचा धडा मिळाला आहे. यापुढे जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे
मुंबई : महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरले. या पराभवाने निवडणुका कशा लढायच्या याचा धडा मिळाला आहे. यापुढे जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे केले, ते-ते यापुढे मीही करणार, महापालिकेतील पराभव हा आपला शेवटचा पराभव असेल, यापुढे पराभव दिसणार नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले.
मनसेच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. महापालिकेतील पराभवानंतर प्रथमच जाहीर सभेत बोलताना राज यांनी या निकालांनी खूपकाही शिकवल्याचे सांगितले. निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्ष कोणत्या थराला जाऊन भांडत होते हे सर्वांनी पाहिले आहे. नाशिकमध्ये आम्ही विकासकामे दाखविली तरीही आमचा पराभव झाला. गुंड जिंकले, ज्यांच्याकडे उमेदवार नव्हते अशी भाजपा जिंकली. ज्यांनी मनसेला मतदान केले त्यांना धन्यवाद, पण ज्यांनी नाही केले त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवले. त्यामुळे आता जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार, त्यांचे डाव मी खेळणार. यापुढे जे पाहिजे त्याचा पुरवठा होईल, असे राज म्हणाले.
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता. आता मी तुम्हाला भेटायला येईन. माझ्यासहीत मनसेचे नेते तुमच्या भेटीला येतील. हा आपला शेवटचा पराभव असेल. यापुढे पराभव दिसणार नाही. आपण जिंकायचंच. त्यासाठी २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य अत्यंत शरमेचे असून, अशांना चौकाचौकांत फोडून काढायला हवे, अशा शब्दांत त्यांनी परिचारकांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)
- पैसा जिंकला, काम हरले! ही माझी निकालाच्या दिवशीची प्रतिक्रिया होती. ईव्हीएम मशीनबाबत सध्या कानावर येत असलेल्या बाबी खऱ्या असतील तर फारच भयानक प्रकरण आहे. भाजपाचे विजयी झालेले ९० टक्के उमेदवार अजूनही चिमटा घेऊन मिळालेला विजय हे स्वप्न तर नाही ना हे तपासत आहेत, असे राज म्हणाले.