ब्रिटिशकालीन रेल्वे बोगदा मोजतोय अखेरची घटका
By Admin | Published: August 23, 2016 05:52 AM2016-08-23T05:52:13+5:302016-08-23T05:52:13+5:30
१६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आसनगाव : महाड येथील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने ब्रिटिशकालीन पुलांचे पाहणीसत्र सुरू केले असले तरी वासिंद रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या १६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या बोगद्यावरून दररोज शेकडो लोकल व एक्स्प्रेस गाड्या जात असल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त करत आहे.
हा रेल्वेमार्ग ब्रिटिशांनी १८५४ मध्ये तयार केला. त्यानंतर, १८५५ ला पहिली रेल्वे वासिंद रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वेमार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी हा बोगदा तयार केला. तथापि, मुरबाड, कल्याण तालुक्याला जोडणारे वासिंद स्थानकाबाहेरील रेल्वेमार्गावरील फाटक ( क्र . ६२ ) २२ वर्षांपूर्वी बंद केल्याने रस्त्यावरील वाहतूक पुढे याच बोगद्यातून वळवण्यात आली. आजही या बोगद्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्यांच्यादेखील जीवाला धोका आहे. २००२ मध्ये या बोगद्याच्या आतील काही भाग पडला होता. त्या वेळेस तेथे सिमेंट व दगडाचा तात्पुरता लेप लावण्यात आला होता.
आजही संपूर्ण वासिंद शहराचे सांडपाणी याच बोगद्यावाटे बाहेर पडत असल्याने त्याची जमिनीखालील बाजू कमकुवत झाली आहे. तसेच वरील बाजूनेही गळती सुरू आहे. काही ठिकाणी बांधकामाचे दगडदेखील पडले आहेत. या बोगद्याच्या वरील भागातून रेल्वे, तर खालील भागातून रस्ते वाहतूक सुरू असल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे ६२ क्रमांकाचे रेल्वेचे फाटक पुन्हा सुरू करून रस्ते वाहतूक सुरू करण्याची मागणी आहे.