शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा सलाम!

By admin | Published: November 20, 2015 04:14 AM2015-11-20T04:14:57+5:302015-11-20T04:14:57+5:30

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) यांच्यावर गुरुवारी सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Last greeted to Colonel Mahadik! | शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा सलाम!

शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा सलाम!

Next

सातारा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) यांच्यावर गुरुवारी सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष महाडिक
अमर रहे’च्या गगनभेदी गर्जना
करीत हजारो नागरिकांनी या उरमोडीपुत्राच्या शौर्याला ‘सॅल्यूट’ केला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यावेळी उपस्थित होते.
कर्नल संतोष शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा शहर आणि परळी खोऱ्यातील लोक शोकसागरात बुडाले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सजविलेल्या लष्करी वाहनातून ते त्यांच्या पोगरवाडी या गावात नेण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून या रस्त्यावर जागोजागी या शूर भूमिपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
या रस्त्यावर ठिकठिकाणी कर्नल संतोष यांना अभिवादन करणारे फलक लावले होते.
कर्नल संतोष यांचे मूळचे आडनाव घोरपडे असून, मावशीकडे ते दत्तक गेले होते. पार्थिव पोगरवाडीत आणण्यापूर्वी आरे येथे नेण्यात आले. तेथे कर्नल संतोष यांना मानवंदना देण्यात आली. येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संरक्षणमंत्री पर्रिकर सहकुटुंब उपस्थित होते. केंद्र
सरकार कुटुंबीयांसोबत असल्याचे सांगून, त्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर अंत्ययात्रा अकरा वाजता पोगरवाडी गावात आणण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली आणि त्याच वेळी कर्नल संतोष यांचा सहा वर्षांचा मुलगा स्वराज याने त्यांना अग्नी दिला. मराठा लाइट इन्फन्ट्रीचे जवान आणि विविध रेजिमेंटचे अधिकारी-जवान या ठिकाणी उपस्थित होते.
तत्पूर्वी, खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे शाहू महाराज, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
सशस्त्र दलांच्या वतीने नौदलाचे महाराष्ट्र एरियाचे फ्लॅग आॅफिसर रिअर अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार, तसेच मराठा लाइट इन्फन्ट्री आणि पॅरा कमांडो फोर्सच्या कर्नल आॅफ दि रेजिमेंटनी पुष्पचक्र वाहिले. माजी लष्करी अधिकारी आणि जवानांनीही यावेळी आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)

उपस्थित हेलावले
अंत्ययात्रा पोगरवाडी गावात येण्यापूर्वीच घोरपडे आणि महाडिक कुटुंबातील महिलांना चबुतऱ्याजवळ आणण्यात आले. संतोष यांच्या आई कालिंदा घोरपडे आणि दत्तक आई बबई महाडिक यांच्यासह संतोष यांच्या पत्नी स्वाती, अकरा वर्षांची मुलगी कार्तिकी, बहीण विजया कदम, भावजय शोभा घोरपडे यांच्यासह महिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरे पाडणारा होता.

वीरपत्नीचा निर्धार
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर शहीद संतोषच्या वीरपत्नीने निर्धार केला की, ‘माझी दोन्ही मुलेही मोठेपणी लष्करातच दाखल होतील. देशाची सेवा करतील.

गावात पेटली नाही चूल..!
लहान मूल रडतेय म्हणून माउलीने घरातील शिळ्या भाकरीचा तुकडा हातावर ठेवला आणि म्हणाली, ‘बाळा अजून कुणीबी चूल न्हाय पेटवली. नगं रडूस, खा वायच. हे समदं झालं की मंग देते तुला च्या अन् कानावला!’ या वाक्यामुळे समजले पोगरवाडीत शहिदाला अभिवादन केल्याशिवाय चूल पेटलीच नाही.

Web Title: Last greeted to Colonel Mahadik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.