अखेरच्या प्रवासासाठीदेखील ‘आधार कार्ड’चा पुरावा दाखवावा लागणार
By sanjay.pathak | Published: October 3, 2017 09:43 PM2017-10-03T21:43:06+5:302017-10-03T21:49:45+5:30
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने आधार कार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधार कार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटाच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्येही सक्तीचे केले आहे. मृत व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही आधार कार्ड सक्तीचे असून ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत, असे सांगितले. आधार कार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसले तरी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात असलेल्या कुटुंबीयांनी आधार कार्ड शोधत आणायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. त्याचबरोबर याच अर्जात सुपारी, सिगारेट, विडी किंवा पान मसाल्याचे व्यसन होते काय आणि किती वर्षांपासून यांसारखे मृत व्यक्तीसंदर्भात प्रश्न देण्यात आले आहेत. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधार कार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.