लुल्लानगर उड्डाणपुलाला अखेर हिरवा कंदील

By admin | Published: June 13, 2016 01:22 AM2016-06-13T01:22:48+5:302016-06-13T01:22:48+5:30

महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले

Last lantern lunar lullanagar flyover | लुल्लानगर उड्डाणपुलाला अखेर हिरवा कंदील

लुल्लानगर उड्डाणपुलाला अखेर हिरवा कंदील

Next


पुणे : लुल्लानगर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले असून, येत्या आठ दिवसांत पुलाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. १० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या पुलाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यास पालिकेला यश आले आहे.
महापालिकेने लुल्लानगर येथे २०११ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करून काम हाती घेतले होते. मात्र, हा कँटोन्मेंटच्या लगतचा परिसर असल्याने संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लष्कराच्या वतीने याचे काम थांबविण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळविण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. संरक्षणमंत्रिपदी मनोहर पर्रिकर आल्यानंतर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविण्याच्या कामास वेग आला. रविवारी दुपारी संरक्षण मंत्रालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ पालिकेला प्राप्त झाले.
लष्कराने उड्डाणपुलास हरकत घेतल्यानंतर, शिवाजी आढळराव पाटील यांनी संरक्षण मंत्रालयाकडे या कामाचा पाठपुरावा केला होता. त्यांनी, एका पिटीशन कमिटीने येऊन या जागेची पाहणी केली होती. या उड्डाणपुलाचा सुधारित आराखड्यासह नवीन प्रस्ताव सादर करण्यास पालिकेला सांगण्यात आले होते. मनोहर पर्रिकर यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी या पुलांच्या जागेची पाहणी करून, या कामाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून अखेर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ पालिकेला प्राप्त झाले आहे. यामुळे या परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सातत्याने चढाओढ लागल्याचे चित्र दिसून आले होते.
>प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘महापालिकेला आज दुपारी संरक्षण मंत्रालयाकडून लुल्लानगर येथील उड्डाणपुलाच्या कामाची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र ) प्राप्त झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. मनोहर पर्रिकर व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या आठ दिवसांत उड्डाणपुलाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाईल. संरक्षण मंत्रालयाचे आम्ही आभारी आहोत.’

Web Title: Last lantern lunar lullanagar flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.