"गेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली, आताही गरज वाटेल तेव्हा सरकार मदत करेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 03:36 PM2021-04-12T15:36:41+5:302021-04-12T15:37:42+5:30
नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास. गेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली, आताही गरज वाटेल तेव्हा सरकार व्यवस्था करेल : नवाब मलिक
"पॅकेज जाहीर करून कर्जबाजारी व्हा... कर्ज घ्या असे मोदीजी जाहीर करतात पण या राज्यात लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना केंद्राप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात जो गरीब मजूर वर्ग आहे त्यांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी सरकारने चार महिने सगळी व्यवस्था केली होती. आताही गरज वाटेल तेव्हा सरकार निश्चितरुपाने व्यवस्था करेल," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी परिस्थिती आम्हाला शिकवत आहेत त्यांनी गुजरातमध्ये हॉस्पिटलशिवाय लोकं मरत आहेत. गुजरात मॉडेलची काय परिस्थिती आहे हे बघितले पाहिजे असा सल्लाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
"लॉकडाऊनमध्ये राज्यात ज्यापद्धतीने कामे सुरू आहेत, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कौतुक करत आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री महेंद्र पांडे मुंबईत आले असता त्यांनीही कौतुक केले आहे. अशाप्रकारची कामे कुठल्याही राज्यात झाली नाहीत," याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.
उत्तर प्रदेशात राम भरोसे कारभार
"उत्तर प्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. अॅन्टीजेन चाचण्या ८० टक्के अॅक्युरसी नाहीत. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होऊ शकते," असेही नवाब मलिक म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्यसरकार जिंदाबाद... मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. परंतु तिथे गेल्यावर भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.