कौस्तुभ यांना अखेरचा निरोप, पित्याने दिला पार्थिवास मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:07 AM2018-08-10T05:07:32+5:302018-08-10T05:07:43+5:30
काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना शहीद झालेले देशाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना गुरुवारी मीरा रोडमध्ये हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
मीरा रोड : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना शहीद झालेले देशाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना गुरुवारी मीरा रोडमध्ये हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. पित्याने आपल्या वीरपुत्राच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. त्या वेळी कौस्तुभ यांची पत्नी कनिका व दोन वर्षांचा मुलगा अगस्त्य सोबत होता. लष्करी इतमामात मानवंदना देताना वरुणराजानेही सलामी दिली. ‘मेजर कौस्तुभ राणे अमर रहे!’, ‘भारतमाता की जय!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मेजर कौस्तुभ यांच्या निधनाची बातमी कळल्यावर मंगळवार दुपारपासूनच नागरिकांचे पाय कौस्तुभ यांच्या घराकडे वळू लागले होते. बुधवारी त्यांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्लीला आणि तेथून रात्री मुंबईला आणले. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता लष्कराने त्यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी आणल्यावर कुटुंबीय, आप्तेष्ट यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर ८ वाजता सामान्यांना पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले. पहाटे ५पासून या नागरिकांनी रांग लावली होती. नागरिकांची वाढती संख्या पाहता अखेर साडेनऊ वाजता लष्कराने दर्शन आवरते घेतले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. साडेनऊ वाजता पार्थिव फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले.
अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मार्गावर फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. साडेनऊ वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. ती शीतलनगर, शांतीनगर, मीरा रोड स्थानक परिसर, पूनमसागर कॉम्प्लेक्स करत वैकुंठधाममध्ये ११ वाजता पोहोचली.
कौस्तुभ यांचे पार्थिव ठेवलेल्या लष्करी वाहनाच्या मागोमागच गृहराज्यमंत्री केसरकर चालत होते. त्यामागे गाडीत कौस्तुभ यांचे आईवडील, बहीण, पत्नी व मुलगा बसला होता. तर, मिरवणुकीच्या सुरुवातीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, कपिल पाटील, रवींद्र फाटक आदी लोकप्रतिनिधी, नगरसेवक चालत होते. वैकुंठभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेट न टाकल्याने अंत्यदर्शनासाठी उसळलेल्या प्रचंड गर्दीला आवरणे पोलिसांना कठीण झाले. पार्थिव वैकुंठभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच आत जाण्यासाठी रेटारेटी झाली. गृहराज्यमंत्र्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारीही यात सापडले. काही पोलिसांना श्वास घेणे अवघड झाले, इतका कठीण प्रसंग ओढवला. यात दोन-तीन जणांना वैद्यकीय मदत केली गेली. मीरा रोडच्या वैकुंठभूमीत अंत्ययात्रा पोहोचल्यावर तेथील फुलांनी सजवलेल्या शेडमध्ये लष्कराने कौस्तुभ यांचे पार्थिव ठेवले. कौस्तुभ यांचे आईवडील, पत्नी, बहीण, लष्करी अधिकाºयांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी आई ज्योती यांच्या अश्रूंचा बांध फुटला. वडील प्रकाश शेवटपर्यंत धीराने आपली जबाबदारी पार पाडत होते.
>तिरंगा पत्नीने हृदयाला कवटाळला
मेजर कौस्तुभ यांच्या पार्थिवावर ठेवलेला राष्ट्रध्वज लष्करी जवानांनी अग्निसंस्कारापूर्वी सन्मानाने काढून पत्नी कनिका यांच्या हाती सोपवला. तिरंग्याच्या रूपाने जणू काही आपला पतीच मिळाला, अशा भावनेने त्या शूरपत्नीने राष्ट्रध्वज हृदयाला कवटाळला. तो प्रसंग पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.
>राखी भावाच्या पार्थिवावर ठेवली
कौस्तुभ यांची बहीण कश्यपी काश्मीरला राखी पाठवणार होती. पण, वैकुंठभूमीत तिने भावाच्या पार्थिवावरच राखी आणि चॉकलेट ठेवत आपली यापुढे कधी न होणारी राखीपौर्णिमा साजरी केली.