ठाण्यातील पाणीपुरवठ्याचा तपासणी अहवाल अंतिम टप्प्यात - बबनराव लोणीकर
By admin | Published: April 2, 2016 01:33 AM2016-04-02T01:33:18+5:302016-04-02T01:33:18+5:30
ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबद्दल मनीषा चौधरी, किसन कथोरे, प्रशांत बंब,
डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुभाष पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
लोणीकर म्हणाले की, मुरबाड तालुक्यामध्ये २००५पासून १८७ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर असून, १० वर्षांमध्ये त्यापैकी ४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३८ योजनांपैकी ३४ योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून, त्यातून पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २१ योजनांची कामे सुरू असून, २३ योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्याने संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र माअंतर्गत मंजूर योजना वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्ण असून, याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत ठाणे जिल्ह्यातील १० वर्षांतील योजनांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात हा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहितीही घेण्यात येत असून, अनेक योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आला आहे, असेही लोणीकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)