शहीद जवान सावन माने यांना अखेरचा निरोप
By Admin | Published: June 25, 2017 01:43 AM2017-06-25T01:43:12+5:302017-06-25T01:43:12+5:30
जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झालेले जवान सावन बाळकू माने यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी गोगवे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झालेले जवान सावन बाळकू माने यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी गोगवे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता.
माने हे २८ मार्च २०१३ रोजी मराठा बटालियन, बेळगाव येथे भरती झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम अहमदाबाद येथे तीन वर्षे कार्यरत होते. त्यांची पाच-सहा महिन्यांपूर्र्वी जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती.
लष्करी वाहनातून तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव सकाळी घरी आणण्यात आले. या वेळी त्यांची आई शोभा, वडील बाळकू, भाऊ सागर माने, बहीण रेश्मा कदम या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर, सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली.
पंचक्रोशीतील प्रत्येक चौकात ‘सावन माने अमर रहे...’ ‘वीर जवान, तुझे सलाम’ अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते.
लष्करी परंपरा...
गोगवे गावची लोकसंख्या तीन हजार आहे. गावातील ११२ जण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. ६० जण माजी सैनिक आहेत. माने यांच्या घराण्यालासुद्धा लष्करी परंपरा आहे. सावन माने यांचे वडील बाळकू हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत, तर थोरले भाऊ सागर हे सध्या आसाम येथे सैन्यदलात कार्यरत आहेत. सावन यांची बहीण रेश्मा यांचे पतीसुद्धा सैन्यदलात आहेत.
पंचक्रोशीतील सर्व व्यवहार बंद
सावन यांचे पार्थिव बांबवडे गावात शनिवारी आणले जाणार, म्हणून बांबवडेसह आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गानेही संपूर्ण दिवसभर ‘बंद’ ठेवून आपल्या लाडक्या सुपुत्राला आदरांजली वाहिली.
यांनी वाहिली आदरांजली
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, १०९ इन्फट्री बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आर. एस. लेहल, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.