दहा महिन्यात १२८ तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By admin | Published: October 25, 2014 11:53 PM2014-10-25T23:53:27+5:302014-10-25T23:53:27+5:30
राज्यात ११00 तक्रारी : १0६६ गुन्हे दाखल
खामगाव (बुलडाणा): राज्यात गत दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२८ तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एसीबीकडे १ जानेवारी ते २२ ऑक्टोबर २0१४ या कालावधीत लाच मागि तल्याच्या सुमारे ११00 तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १0६६ तक्रारींच्या अनुषंगाने लाच स्वीकारणांर्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये तब्बल १२८ तलाठय़ांचा समावेश आहे.
भ्रष्टाचार आणि लाचलुचपतीस आळा घालण्यासाठी एसीबीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये धडक मोहिमेअंतर्गत सुमारे ११00 तक्रारींची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट आहे. त्यामुळे लाच स्वीकरताना रंगेहात पकडल्या गेलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पकडल्या गेलेल्यांच्या यादीत तलाठय़ांपाठोपाठ, शासकीय व निमशासकीय सेवांमधील अभियंत्यांचा क्रमांक लागतो. गत दहा महिन्यात एकूण ६७ अभियंत्यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. यादीत तिसर्या स्थानावर डॉक्टर आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील व्यक्तींनाही लाचखोरीचा मोह आवरत नसल्याचे वास्तवही या आकडेवारीवरून समोर आले असून, राज्यातील २६ शिक्षकांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ११ वकीलही अडकल्याची माहिती असून, २९ लोकप्रतिनिधींवरही कारवाईची तलवार लटकलेली आहे.
*महसूल कर्मचा-यांच्या विरोधात ३६0 तक्रारी
नागरिकांशी थेट संबंध येत असलेल्या महसूल विभागात मोठय़ा प्रमाणात लाच स्वीकारल्या जात असल्याची वस्तुस्थिती या आकडेवारीवरून समोर आली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत लाचखोरीच्या तब्बल ३६0 तक्रारी, एकट्या महसूल विभागातील कर्मचार्यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. त्यापाठोपाठ गृह विभागातील कर्मचार्यांच्या विरोधात ३३८, तर ग्रामविकास खात्यातील कर्मचार्यांच्या विरोधात १५३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांनतर नगर विकास, शिक्षण, आरोग्य व महावितरणचा क्रमांक लागतो.