दोन वर्षात 1355 बोगस बसभाडे सवलत कार्ड जप्त
By admin | Published: December 25, 2016 02:53 PM2016-12-25T14:53:08+5:302016-12-25T14:53:08+5:30
महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात सवलत लाटण्यासाठी ५५-५८ वर्षाचे नागरिकही कागदावर ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बनत असल्याचे धक्कादायक वास्तव
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 25 - महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात सवलत लाटण्यासाठी ५५-५८ वर्षाचे नागरिकही कागदावर ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बनत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. एस.टी. महामंडळ आगाराने गत दोन वर्षात राबविलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल १३५५ कार्ड बोगस असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यात रिसोड, वाशिम, कारंजा व मंगरुळपीर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे. एस.टी.च्या माध्यमातून परिवहन महामंडळ ग्रामीण भागात पोहोचले आहे. बसभाड्यातील सवलतीमुळे एसटीचे प्रवाशी अजून टिकून आहेत. दिव्यांग बांधवांना बसभाड्यात ७५ टक्के तर ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते. दिव्यांग प्रवाशांसाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान कार्ड ग्राह्य धरले जाते. बसच्या प्रवासादरम्यान ही सवलत लाटण्यासाठी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांचे बोगस प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.
सन २०१५ मध्ये महामंडळाच्या चार आगारांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेत ८४५ बोगस कार्ड जप्त केले होते. यामध्ये रिसोड आगार २००, वाशिम २७०, कारंजा १२५ व मंगरुळपीर आगाराच्या मोहिमेतील २०० बोगस प्रमाणपत्रांचा समावेश होता. सन २०१६ मध्ये राबविलेल्या मोहिमेत ५१० प्रमाणपत्र हे बोगस असल्याच्या संशयावरून जप्त केले आहेत. यामध्ये मंगरुळपीर ११०, कारंजा १६५, रिसोड ११५, वाशिम १२० असा बोगस प्रमाणपत्रांचा समावेश आहे.