नाथजोगी जातपंचायतीवर अखेर गुन्हे दाखल
By admin | Published: November 26, 2015 03:23 AM2015-11-26T03:23:59+5:302015-11-26T03:23:59+5:30
समाजातून बहिष्कृत करून, पुन्हा समाजात यायचे असेल तर पाच लाख रूपयांचा दंड ठोठावणाऱ्या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीविरोधात अखेर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले
वाशिम : समाजातून बहिष्कृत करून, पुन्हा समाजात यायचे असेल तर पाच लाख रूपयांचा दंड ठोठावणाऱ्या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीविरोधात अखेर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. जात पंचायतीच्या निर्दयी भूमिकेमुळे रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील एका पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
लोकमतने हे प्रकरण प्रभावीपणे उचलून धरल्यानंतर, जात पंचायतीतील जवळपास १२ ते १५ सदस्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली. सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी झाला होता; मात्र मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळीने याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जात पंचायतीचे
प्रमुख बापू चिमाजी सेगर
यांच्याकडे तक्रार केली होती. जात पंचायतने याप्रकरणी सुभाष सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला, तसेच समाजात परत यायचे असेल, तर त्यांनी पाच लाख रूपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. हा धक्का सहन न झाल्याने सुभाष सावंत यांचा ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूस जातपंचायतीचा निर्णय कारणीभूत असल्याची तक्रार मृताचे वडील आप्पाराणू सावंत यांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे केली होती; मात्र घटनास्थळ रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी हात झटकले. ‘लोकमत’ने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर हालचाली सुरू झाल्या.