अखेर विदर्भाच्या नंदनवनाने टाकली कात
By admin | Published: August 10, 2014 01:27 AM2014-08-10T01:27:15+5:302014-08-10T01:27:15+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर उशिरा का होईना ‘निसर्गसौंदर्य’ फुलू लागले आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके, उंच डोंगरावरून दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
नरेंद्र जावरे - चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर उशिरा का होईना ‘निसर्गसौंदर्य’ फुलू लागले आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके, उंच डोंगरावरून दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो़ विदर्भाचे एकमेव नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या सेमाडोहसुद्धा पर्यटकांची गर्दी खेचत आहे. चिखलदरा पर्यटन स्थळावर इतिहासकालीन गाविलगड किल्ला, महाभारतकालीन भीमकुंड, एका सादाला प्रतिसाद देणारा पंचबोल, आदिवासींचे कुळदैवत, देवीपॉइंट येथील जनादेवीचे मंदिर, हरिकेन, मोझरी, सनसेट पॉइंट व नौकाविहार अशा प्रेक्षणीय स्थळांना हजारो पर्यटक भेट देऊन आनंद घेत आहेत. या वर्षी एप्रिल ते जुलै या काळात जवळपास २२ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. चिखलदरा पर्यटनाचा पॅकेज टूरसुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यासह, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून येणारे पर्यटक करतात. व्याघ्र प्रकल्प असलेल्या सेमाडोह पर्यटन स्थळासह जंगल सफारी व भव्य सिपना नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरत नाही.
पाऊस उशिरा पण जोराचा : सर्वत्र पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्याचा फटका चिखलदरा पर्यटन स्थळालासुद्धा बसला. ७ जूनपूर्वीच चिखलदरा पर्यटन स्थळावर हजेरी लावणारा वरुण राजा या वेळी मात्र रुसला. परंतु, काही दिवसांनी २४ तासांत तब्बल ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चिखलदरा पर्यटन स्थळ अप्पर आणि लोअर प्लेटो अशा दोन भागांत वसले आहे. येथील लोकसंख्या पाच हजार असून, राज्यातील ‘क’ वर्ग असलेली सर्वांत लहान नगर परिषद आहे. अप्पर प्लेटोवर आतापर्यंत ७९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी १४११ मि.मी. एवढी होती.