आरती अंकलीकर-टिकेकर यांना जीवनगौरव; अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:38 AM2024-08-14T07:38:31+5:302024-08-14T07:40:15+5:30
प्रकाश बुद्धिसागर, शुभदा दादरकर यांचाही 'जीवनगौरव'ने होणार सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, सन २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांची मंगळवारी घोषणा केली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना, संतसाहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार (२०२३) शशिकला झुंबर सुक्रे यांना घोषित झाला असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.
इतर पुरस्कारांचे मानकरी
- नाटक - विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत डॉ. विकास कशाळकर
- कंठसंगीत - सुदेश भोसले, लोककला अभिमन्यू धर्माजी सावदेकर
- शाहिरी - शाहीर राजेंद्र कांबळे
- नृत्य - सोनिया परचुरे
- चित्रपट - रोहिणी हटंगडी
- कीर्तन प्रबोधन - संजयनाना धोंडगे
- वाद्यसंगीत - पांडुरंग मुखडे
- कलादान- नागेश सुर्वे (ऋषीराज)
- तमाशा - कैलास मारुती सावंत
- आदिवासी गिरीजन - शिवराम शंकर धुटे
जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ
- सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पूर्वी रोख रक्कम ५ लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रुपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे करण्यात आले आहे.
- राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लाख रोख, मानपत्र व मानचिन्ह असे करण्यात आले आहे.