लता मंगेशकर महाविद्यालय २८ सप्टेंबरपासून सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:43 AM2022-08-17T05:43:00+5:302022-08-17T05:43:23+5:30
Eknath Shinde : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून, त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय येत्या २८ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एका बैठकीत दिले.
हे महाविद्यालय मुंबईत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि यंदा किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पदविका आणि पदवी सुरू करण्यात यावेत. हे महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचेच झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरते महाविद्यालय
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून, त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.