Lata Mangeshkar : "दीदी गेल्या असल्या तरी..."; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी, झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:21 AM2023-02-06T11:21:52+5:302023-02-06T11:38:03+5:30
Lata Mangeshkar Death Anniversary And Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहून आठवणी जागवल्या आहेत.
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. विविध क्षेत्रातून लतादिदींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहून आठवणी जागवल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच "दीदींच गाणं कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन!" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
...लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.#LataMangeshkar#LataDidipic.twitter.com/QYN3aDCWkR
— Raj Thackeray (@RajThackeray) February 6, 2023
लता मंगेशकर यांच्या आवाजाने प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहीत नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.
लता दीदींना 2001 साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 1992 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानेही 1984 सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"