लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाची डी. लिट
By admin | Published: February 6, 2017 05:14 PM2017-02-06T17:14:11+5:302017-02-06T17:14:11+5:30
नकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाच्या वतीने डी. लिट या सन्माननीय पदवीने सन्मानित करण्यात येणार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - गानकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाच्या वतीने डी. लिट या सन्माननीय पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्याचे औचित्य साधून मंगेशकर यांना डी. लिट पदवी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत राज्यपालांच्या हस्ते एका विशेष समारंभात लवकरच त्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
मुक्त विद्यापीठाचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभात १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून लता मंगेशकर यांना डी.लिट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाने मंगेशकर यांच्याशी संपर्क साधून पदवीप्रदान सोहळ्यातच डी.लिट प्रदान करण्याची इच्छा प्रगट केली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगेशकर नाशिकला येऊ शकत नसल्याने मुंबईत एका विशेष समारंभात त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने २०११ मध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले यांना डी.लिट पदवी देऊन गौरव केला आहे. विद्यापीठाने सचिन तेंडुलकर यांच्या नावाचीही तत्पूर्वी घोषणा केली होती. परंतु सचिनने नम्रपणे नकार दिल्यानंतर आशा भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले. आता सहा वर्षांनंतर डी.लिट पदवीने लता मंगेशकर यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठाने वि. वा. शिरवाडकर, शांताबाई दाणी, बाबा आढाव यांना डी.लिट उपाधीने सन्मानित केले आहे.