दिवंगत भालचंद्र देशमुख उत्तम प्रशासक, मरणोत्तर पुरस्कार : उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:20 AM2017-10-12T03:20:22+5:302017-10-12T03:20:27+5:30
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय यांनी बुधवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा पुरस्कार दिवंगत भालचंद्र देशमुख यांच्या वतीने स्वीकारला.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर या तीन पंतप्रधानांसोबत महत्त्वाची कामगिरी बजावलेले सनदी अधिकारी दिवंगत भालचंद्र देशमुखांनी कॅबिनेट सचिव या सर्वोच्च पदावर काम करण्यापूर्वी मुंबई महापालिकेचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदांसह केंद्र सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले. प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत लोक प्रशासनात अनेक आदर्श पायंडे देशमुखांनी पाडले.
भारतीय राजकारणातल्या अद्वितिय घटनांची साक्ष देणारे व भारताच्या अलौकिक ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारे ‘पुना टू प्राइम मिनिस्टर्स आॅफिस’,‘अ कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स अ लाऊ ड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउंड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’यासह अनेक ग्रंथ भालचंद्र देशमुखांनी लिहिले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ)मध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले देशमुख जनवाणीचे अध्यक्ष होते. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्रातील क्षेत्रिय संस्थेची सूत्रेही अनेक वर्षे सांभाळली. सनदी नोकरशाहीला मार्गदर्शन करणाºया या संस्थेला त्यांनी १0 लाखांची देणगी दिली. देशमुखांच्या चौफेर कारकिर्दीच्या स्मृतीप्रित्यर्थ या संस्थेत प्रतिवर्षी मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान व निबंध स्पर्धा आयोजित केली जाते.
भारत सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भालचंद्र देशमुख पुण्यात स्थायिक झाले. शासनाच्या कामकाजावर जनतेचा विश्वास वृध्दिंगत व्हावा या हेतूने ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या संस्थेच्या स्थापनेत व उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्यात अनेक स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष, विश्वस्थ या नात्याने समाजसेवेची अनेकविध कामे, देशमुखांच्या हातून घडली.