नवविवाहितेला सासरच्यांनी लोटले देहविक्री व्यवसायात
By Admin | Published: June 23, 2016 12:25 AM2016-06-23T00:25:56+5:302016-06-23T10:12:35+5:30
तीन महिन्यांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले. सुखी संसाराची स्वप्न रंगवित तिने सासरी पाय ठेवला. मात्र लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तिच्या स्वप्नांचा अक्षरक्ष: चुराडा झाला
नवरा, सासू, सासरा अटकेत: हातावरची मेहंदी सुखण्याच्या आतच ठेवायला लावले अनेकांशी शरीर संबध
औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले. सुखी संसाराची स्वप्न रंगवित तिने सासरी पाय ठेवला. मात्र लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तिच्या स्वप्नांचा अक्षरक्ष: चुराडा झाला. हातावरची मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पतीसह सासरच्या मंडळींनीच या नवविवाहितेला चक्क देहविक्री करण्यास भाग पाडले. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगरात घडलेला धक्कादायक प्रकाराला तीन महिने नरकयातना भोगलेल्या पीडितेनेच काल कसेबसे मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत वाचा फोडली.
तिला देहविक्री करण्यास भाग पडणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नवरा, सासू व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील रविवासी असलेल्या संगीता (वय १८, नाव बदलले आहे) हिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी अंबिकानगरातील सुनिल (नाव बदलले आहे) याच्यासोबत झाला. संगीताच्या घरच्यांनी मोठ्या धुमधडाक्यात तिचा विवाह लावून दिला. लग्नानंतर भविष्यातील सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास संगीताने सुरूवात केली. लग्नानंतर दोन आठवडे सासरच्या मंडळींनी तिला नववधूसारखे गुण्यागोविंदाने नांदविले.
अन् तिला धक्काच बसला!
लग्नानंतर बरोबर पंधराव्या दिवशी अचानक सासरची मंडळी एका अनोळखी व्यक्तीला घरी घेऊन आले. कुणी पाहुणा असावा, असे संगीताला वाटले; मात्र, पुढे सासरच्या मंडळींचे शब्द ऐकून तिला धक्काच बसला. घरी आलेल्या त्या अनोळखी व्यक्तीबरोबर पती, सासू व सासरच्याने तिला शरीर संबध ठेवण्याचे सांगितले. तिने नकार देताच सासरच्या मंडळींनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याचे लक्षात येताच सासरच्यांनी चक्क तिला ठार मारण्याची धमकी देत त्या व्यक्तीसोबत शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे नंतर त्या व्यक्तीकडून सासरच्या मंडळींनी पैसेही घेतले. तेव्हा सासरचे खरे रुप तिला लक्षात आले.
अनेकांशी संबध ठेवण्यास पाडले भाग
ह्यत्याह्ण दिवसानंतर सासरची मंडळी दररोज रात्री नवनवीन ग्राहक घेऊन येऊ लागली आणि त्यांच्यासोबत तिला संबध ठेवण्यास भाग पाडण्यात येऊ लागले. नंतर तर तिला बाहेर गावीही देहविक्रीसाठी नवरा घेऊन जाऊ लागला. त्यातून येणाऱ्या पैशांतून सासरची मंडळी मौजमजा करीत होती. या नरकातून कशी सुटका करून घ्यावी, या चिंतेने संगीताला ग्रासले होते. विरोध करताच सासरची मंडळी तिला, तिच्या बहिणींना ठार मारू, अशा धमक्या देत होती. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत सासरच्यांनी संगीताला अनेक परपुरुषांसोबत शरीर संबध ठेवण्यास भाग पडले.
गुन्हा दाखल, तिघांना अटक
तीन महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर संगीताने काल मोठ्या शिताफीने सासरच्या मंडळींच्या तावडीतून सुटका करून घेत सरळ मुकुंदवाडी ठाणे गाठले. ठाण्यात येताच तिने आपबिती सांगितली. लगेच पोलिसांनी तिचा पती, सासरा आणि सासूविरुद्ध देहविक्रीस भाग पडणे, छळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला. नंतर सहायक निरीक्षक गिते व त्यांच्या साथिदारांनी तिच्या सासरच्या घरी छापा मारला आणि या तिन्ही आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिते हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.