आमच्यामुळे दीडलाखाची कर्जमाफी - शिवसेना
By admin | Published: June 24, 2017 05:33 PM2017-06-24T17:33:41+5:302017-06-24T17:33:41+5:30
कर्जमाफीच्या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणा-या शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - कर्जमाफीच्या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणा-या शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सत्तेत राहून विरोध कसला करता ? असा प्रश्न आम्हाला विचारण्यात येत होता. पण सत्तेत राहून काय करता येते हे आम्ही दाखवून दिले असे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या आग्रहामुळे दीडलाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने जाहीर केली असे सांगत त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या घोषणेमुळे सर्वसामान्य शेतक-याला फायदा होणार असून सातबारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी
- दीडलाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ
- 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे
- 40 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होणार.
- नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना कर्जमाफीमधून वगळल.
- 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
- लोकप्रतिनिधी, आमदारांना कर्जमाफीच्या निर्णयातून वगळल.
- हा अभूतपूर्व निर्णय असून, यापेक्षा कर्जमाफीचा बोजा उचण्याची क्षमता नाही.
2012 पासून पडणा-या दुष्काळामुळे शेतकरी कर्जात बुडाला होता. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी सुरु होती. आम्ही सभागृहात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी संदर्भात आमची विविध घटकांशी चर्चा सुरु होती. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे आम्ही आंदोलकांना सांगितले होते असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.