कर्जमाफीसाठी अखेरपर्यंत लढणार

By admin | Published: April 5, 2017 02:51 AM2017-04-05T02:51:20+5:302017-04-05T02:51:20+5:30

रायगड जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पनवेल शहरात मंगळवारी संघर्ष यात्रेचा समारोप झाला.

Late fight for debt waiver | कर्जमाफीसाठी अखेरपर्यंत लढणार

कर्जमाफीसाठी अखेरपर्यंत लढणार

Next

कळंबोली : रायगड जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पनवेल शहरात मंगळवारी संघर्ष यात्रेचा समारोप झाला. पहिल्यांदाच राजकीय नेत्यांची मांदियाळी शहरात जमल्याने एक प्रकारे राजकीय छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली.
शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य राहिलेला पनवेल तालुका सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. काँग्रेस पक्षाने शेकापला कायम टक्कर दिली, मात्र आता दोनही पक्ष विरोधी बाकावर असून त्यांनी सरकारविरोधात आघाडी केली आहे. यात राष्ट्रवादीचाही सहभाग आहे. राष्ट्रवादी व शेकाप रायगड जिल्हा परिषदेत सत्तेत आहेत. त्याचबरोबर पनवेल महापालिका निवडणूक एकत्रित लढणार असल्याने पनवेलला सांगता झालेल्या संघर्ष यात्रेला महत्त्व प्राप्त झाले होते.
पनवेलच्या इतिहासात राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी इंदिरा गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह बडे नेते पनवेलला येवून गेले आहेत. परंतु मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी पनवेलला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, भास्करराव जाधव, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील आमदार उपस्थित होते. दोनही काँग्रेसचे सर्व नेते रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एकत्र आल्याने त्यांचे भाषण ऐकण्याकरिता रायगडसह राज्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
>पनवेल लालबावटामय
संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभाची जवळपास पूर्ण जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाने उचलली होती. त्यांना दोनही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. मात्र या माध्यमातून शेकापने शक्तिप्रदर्शन करीत भाजपावर कुरघोडी केली. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात लालबावटा असणारे झेंडे लावण्यात आले होते. त्याचबरोबर यात्रेत आलेल्या आमदार तसेच इतरांचे स्वागत सुद्धा शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. भव्य दिव्य स्वरूपाचा स्टेज उभारण्यात आला होता. त्या पाठीमागे लालबावट्याचा रंग दिसत होता.
>मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी हाऊसफुल्ल
मिडलक्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर संघर्ष यात्रेची सांगता सभा झाल्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात आली होती. तसेच व्हीआयपी वाहने उभे करण्याकरिता मैदानावर विशेष सोय करण्यात आली होती. यावेळी वाहतूककोंडी होवू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती.

Web Title: Late fight for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.