उशिरा लग्न लावल्यास पाच हजाराचा दंड !
By admin | Published: January 12, 2016 01:37 AM2016-01-12T01:37:31+5:302016-01-12T01:37:31+5:30
भावसार समाजाचे ‘समय के साथ चलो’ अभियान.
अनिल गवई /खामगाव (जि.बुलडाणा): गेल्या काही दिवसांपासून उशिरा लग्न लावण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणार्या वर्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्रमंडळीला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी भावसार समाज मंडळाने पुढाकार घेतला असून, यापुढे समाजामध्ये उशिरा लग्न लावणार्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजारांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने रविवारी येथे घेतला. उशिरा लग्न लावण्याची प्रथा रूढ झाल्यामुळे अनेकदा बँड पथक, मंगल कार्यालय आणि तत्सम गोष्टींसाठी विहीत मुदतीत केलेल्या करारावरून तसेच वधू, वराकडील मंडळींमध्ये वादही उद्भवतात. या पृष्ठभूमिवर वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नीत असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. तसे विविध ठरावदेखील एकमुखाने संमत करीत या ठरावाची अंमलबजावणी १0 जानेवारीपासून सुरु केली आहे. उशिरा लग्न लावणार्या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपये म्हणजेच दोन्ही पक्षांकडून पाच हजारांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. भावसार समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन खामगावजवळ असलेल्या जनुना देवी येथे रविवारी पार पडले. या सभेला भावसार समाजाचे महाराष्ट्र तथा विदर्भातील नेते मंडळी मोठय़ासंख्येने उपस्थित होती. पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार ! वेळेवर लग्न लावण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही भावसार समाजाने पुढाकार घेतला आहे. समाजातील आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी, तेरवी यासारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रवाळ्या, द्रोण सुध्दा न वापरण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. त्यामुळे प्लास्टीक द्रोण आणि पत्रावळी वापरल्यास २१00 रुपये दंड सुध्दा संबंधितांना भरावा लागणार आहे.