कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाला लेट मार्क
By admin | Published: June 18, 2016 01:40 AM2016-06-18T01:40:45+5:302016-06-18T01:40:45+5:30
कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला लेट मार्क लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण दुहेरीकरणातील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून
मुंबई : कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला लेट मार्क लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण दुहेरीकरणातील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र निविदेतच (टेंडर) काम अडकल्याने दुहेरीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही.
मध्य रेल्वेवरील पनवेल ते रोहा या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागोठणे ते रोहा पट्ट्यातील अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी असून ते २0१६ च्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. कोकण रेल्वेकडूनही कोलाड ते ठोकूरपर्यंत दुहेरीकरणाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर या मार्गावरील ७४१ किलोमीटरचे काम टप्प्याटप्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील रोहा ते वीर या ४७ किलोमीटरच्या अंतराच्या कामासाठी ८ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर कामासाठी निविदा काढण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने निविदा प्रक्रीया लांबली. त्यानंतर या वर्षाच्या मे महिन्यापासून काम सुरु होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडूनच देण्यात आली होती. परंतु मे महिना उलटूनही त्या काम सुरू झालेले नाही. निविदेची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कोकण रेल्वेतील सूत्रांनी दिली. मात्र काम कधीपासून सुरु होईल याची निश्चित माहिती देण्यात आली नाही. (प्रतिनिधी)
- संपूर्ण दुहेरीकरणासाठी जवळपास १0 ते ११ हजार कोटींचा खर्च आहे.
- पहिल्या टप्प्यातील कामासाठी एकूण २९५ कोटी रुपये खर्च आहे.
- पहिल्या टप्प्यासाठी एलआयसीकडून कोकण रेल्वेला सुमारे २५0 कोटींचे कर्ज मंजुर झाले आहे.
- दुहेरीकरण झाल्यावर रोजच्या फेऱ्या ४५ वरुन ९0 वर जातील.
- कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचे काम हे टप्प्याटप्यात होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरण करतानाच अकरा नवीन स्थानकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली आहे.