रेल्वे अपघाताचा फटका! पोलीस परीक्षार्थींना लेटमार्क, ‘पीएसआय’साठी विद्यार्थ्यांना हवी पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 10:15 AM2022-04-17T10:15:42+5:302022-04-17T10:16:35+5:30
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण २५० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, १६ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मुंबईसह महाराष्ट्रातील ७ जिल्हा केंद्रांवर घेण्याचे नियोजित होते.
मुंबई : माटुंगा स्थानकाजवळ झालेल्या पुद्दुचेरी-गदग एक्स्प्रेसच्या रेल्वे अपघाताचा फटका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शनिवारी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींना बसला. लाेकल सेवा विस्कळीत झाल्याने एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या परीक्षार्थींना उशीर झाला आणि त्यांची परीक्षेची संधी हुकली. तब्बल ४ ते ५ वर्षे अभ्यास करून परीक्षेची तयारी केलेल्या पोलीस परीक्षार्थींना त्यांची चुकी नसताना परीक्षेला मुकावे लागल्याने या परीक्षेसाठी त्यांना पुन्हा एक संधी द्यावी, अशी मागणी हे परीक्षार्थी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण २५० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, १६ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मुंबईसह महाराष्ट्रातील ७ जिल्हा केंद्रांवर घेण्याचे नियोजित होते. तब्बल चार वर्षांनंतर ही परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेसाठी दीड तास आधी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या होत्या. पण या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. त्यामुळे काही परीक्षार्थींना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. एल्फिन्स्टन केंद्रावर कल्याणसारख्या ठिकाणाहून येणारे परीक्षार्थी सकाळी ७ वाजत निघूनही रेल्वे सेवेला लागलेल्या लेटमार्कमुळे वेळेवर परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. या केंद्रावर १८ ते २० पोलीस परीक्षार्थी या कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले असून आमची पुन्हा परीक्षा घ्यावी किंवा ही परीक्षा रद्द करावी आणि पुन्हा नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एमपीएससीच्या निर्णयाकडे लक्ष
एमपीएससी प्रशासनाला यासंदर्भात माहिती विचारली असता परिस्थिती कळली असली तरी परीक्षार्थींच्या तक्रारी अद्याप पोहोचल्या नसल्याची माहिती सचिव सुनील अवताडे यांनी दिली.दरम्यान, पोलीस परीक्षार्थींच्या मागणीवर पुढे काय कार्यवाही होते, की त्यांची संधी ही हुकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.