दिवंगत रा. ग. जाधव यांना तावडेंनी पाठविले शुभेच्छापत्र! जाधव यांच्या नावे साधना ट्रस्टच्या पत्त्यावर पाठविण्यात आले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:49 AM2017-08-21T04:49:15+5:302017-08-21T04:50:04+5:30
राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनोद तावडेंकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.
पुणे : राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनोद तावडेंकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचा रखडलेला निकाल, पेपर तपासणीतील गोंधळ यामुळे विनोद तावडे यापूर्वीच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. त्यातच आता सांस्कृतिक खात्याकडून तावडेंची स्वाक्षरी असलेले शुभेच्छापत्र रा. ग. जाधव यांच्या नावे साधना ट्रस्टच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. ‘आपण कठोर परिश्रम करून आजवरचा प्रवास यशस्वी केला आहे. येणाऱ्या आयुष्यात आपल्याला स्वत:तील विविध पैैलू उमगावेत आणि त्यातून यशाच्या उत्तुंग शिखरावर आपण पोहोचावे, ही मनोकामना आहे. हा वाढदिवस आपल्याला आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो’, अशा आशयाचा मजकूर या पत्रामध्ये आहे.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना फेब्रुवारी २०१६मध्ये तावडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला होता. तर, २७ मे रोजी जाधव यांचे निधन झाले त्यावेळी जाधव यांना राज्य सरकारतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. तावडेंनीही शोकसंदेश पाठवला होता. २४ आॅगस्ट रोजी जाधव यांची जयंती आहे. साहित्यिकाच्या निधनाचा विसर पडून त्यांना शुभेच्छा पाठवणाऱ्या तावडेंच्या या अजब कारभाराबाबत साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नजरचुकीने पत्र पाठवले
परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांचा वाढदिवस त्याच दिवशी होता. दोन नावांतील समानतेमुळे नजरचुकीने साहित्यिक रा. ग. जाधव यांना शुभेच्छापत्र पाठविले गेले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.