लेटनाईट पार्टी जीवावर बेतली

By admin | Published: August 8, 2014 01:12 AM2014-08-08T01:12:56+5:302014-08-08T01:12:56+5:30

सुसाट वेगाने धावणारी कार अनियंत्रित होऊन झाडावर आणि नंतर वॉल कंपाऊंडवर आदळली. परिणामी कारमधील एकतरुण आणि त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. तर, एका तरुणीसह दोघे

Late Night Party Live At Betli | लेटनाईट पार्टी जीवावर बेतली

लेटनाईट पार्टी जीवावर बेतली

Next

भरधाव कार झाडावर आदळली : महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा मृत्यू
नागपूर : सुसाट वेगाने धावणारी कार अनियंत्रित होऊन झाडावर आणि नंतर वॉल कंपाऊंडवर आदळली. परिणामी कारमधील एकतरुण आणि त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. तर, एका तरुणीसह दोघे गंभीर जखमी झाले. अमरावती मार्गावरील एलआयटी गेटजवळ बुधवारी मध्यरात्री १२.३५ ला हा भीषण अपघात घडला.
अनुराग अनिल खापर्डे (वय २३) आणि इतिशा मोहन मालय(वय २१) अशी मृतांची नावे आहे. जखमींची नावे उज्ज्वल गुटगुटिया (वय २२) आाणि श्रेया जगदीशचंद्र जोशी (वय २१) अशी आहेत. अनुराग आणि उज्ज्वल वायसीसीचे तर इतिशा आणि श्रेया सेंट विन्सेंट पलोटी इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिकत होते. इतिशा औरंगाबादची तर श्रेया छत्तीसगडमधील रायगड येथील मूळ निवासी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या या दोघी छत्रपती चौकातील शिवहरी अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहात होत्या.
अनुराग, उज्ज्वल, इतिशा आणि श्रेया हे चौघे बुधवारी रात्री वाडी जवळच्या क्लब अ‍ॅसेस लाउंजमध्ये पार्टीसाठी गेले होते. परत येताना अनुराग आपली होंडा सिटी कार (एमएच ३१/ डीके १९०९) अतिशय वेगात चालवित होता. कॅम्पस चौकापासून उतार असूनसुद्धा अनुरागने कारचा वेग कमी केला नाही. मित्रांसोबत बोलताना त्याचे काही क्षणासाठी लक्ष विचलित झाले आणि भरधाव कार अनियंत्रित होऊन एलआयटी गेटसमोर (पीएनबी जवळ) रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. कारचा वेग एवढा जास्त होता की, कार झाडावर आदळल्यानंतरही थांबली नाही. ती तशीच समोरच्या वॉल कंपाऊंडवर धडकली. मोठा आवाज आणि कारमधील तरुण-तरुणींच्या किंकाळ्यांनी मध्यरात्रीची भयाण शांतता भेदली. आजूबाजूचे रहिवासी घराबाहेर निघाले. कारची पुरती मोडतोड झाली होती. कारमधील एक तरुणी समोरच्या घराच्या अंगणात फेकली गेली होती. जखमी विव्हळत होते. बघ्यांपैकी काहींनी जखमींना कारच्या बाहेर काढले. त्यांना पाणी पाजले. तर, एकाने पोलिसांना ही माहिती दिली. अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. चौघांनाही रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अनुराग आणि इतिशाला मृत घोषित केले.
श्रेयाची मृत्यूशी झुंज
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गंभीर व चिंतेचे भाव. जणू प्रत्येक जण मनोमन तिच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत असावा. रविनगर येथील दंदे रुग्णालय महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी गच्च भरले होते. ती सर्व गर्दी सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या श्रेया जोशी हिच्यासाठी होती.
श्रेया ही मूळची रायगड येथील आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी ती गत तीन वर्षांपासून नागपुरात राहत आहे. सध्या पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. मात्र बुधवारी रात्री उशिरा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी आटोपून परत येत असताना, एलआयटी कॉलेजच्या गेटसमोर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला, आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तिच्या आई-वडिलांना मुलीला गंभीर अपघात झाल्याचे कळताच, जबर धक्का बसला. लगेच ते रायगडवरून नागपूरकडे निघाले. इकडे महाविद्यालयातील शिक्षकांसह शेकडो विद्यार्थी रुग्णालयात पोहोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत होते. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास श्रेयाचे आई-वडिलही रुग्णालयात पोहोचले. मुलीच्या काळजीने तिची आई पूर्णत: खचली होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. श्रेयाचे मित्र-मैत्रिणी त्यांना धीर देत होते. दुसरीकडे श्रेयाचे वडील स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी जड अंतकरणाने श्रेया ही लहानपणापासून फार हुशार असून, तिचा आम्हाला नेहमीच अभिमान असल्याचे यावेळी ते म्हणाले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी कायम होती. (प्रतिनिधी)

Web Title: Late Night Party Live At Betli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.