नंतर महाराष्ट्रात आले! भगत सिंह कोश्यारी १९८९ ला हरले, मग २५ वर्षांनी खासदार झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:19 AM2024-03-26T10:19:18+5:302024-03-26T10:20:09+5:30
Bhagat Singh Koshyari Interesting Story: अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून १९८९ ला कोश्यारी लोकसभेला उभे ठाकले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तरुण तुर्क हरीश रावत उभे होते.
माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाव महाराष्ट्रात तरी कोणाला माहिती नसेल असे नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातली प्रचंड उलथापालथीची ती काही वर्षे कोश्यारी यांच्यामुळेही गाजली. याच कोश्यारी यांना लोकसभेवर जाण्यासाठी २५ वर्षे वाट पहावी लागली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेल्या कोश्यारी यांना १९८९ च्या पराभवानंतर थेट २०१४ मध्ये खासदारकी मिळाली होती. तोवर त्यांनी निवडणूक न लढविण्याची प्रतिज्ञा पाळली होती.
अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून १९८९ ला कोश्यारी लोकसभेला उभे ठाकले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तरुण तुर्क हरीश रावत उभे होते. कोश्यारी तेव्हा ४७ वर्षांचे होते. काँग्रेस विरोधी लाट होती. याच निवडणुकीत आणखी धुरंधर सेनानी उभा ठाकला होता. वेगळ्या उत्तराखंड राज्याची धग पेटविणारे काशी सिंह ऐरी देखील उभे राहिले होते. यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येईल असे भाजपाला वाटत होते.
परंतु निवडणुकीला घडले भलतेच. रावत निवडून आले. पावणे चार लाखांपैकी कोश्यारींना 34768 मते मिळाली. डिपॉझिट वाचविण्याची धन्यता तेव्हा भाजपला मानावी लागली. १९९१ च्या निवडणुकीच्या तिकीटाच्या रेसमधून कोश्यारी आपणहूनच मागे सरले. परत लोकसभा लढण्यासाठी कोश्यारींना २०१४ ची वाट पहावी लागली.
काँग्रेसविरोधी वातावरण, मोंदींची लाट आदी त्यांना पोषक ठरले व कोश्यारी नैनिताल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. यानंतर २०१६ मध्ये त्यांनीच पुढील लोकसभा लढणार नसल्याची घोषणा केली. २०१९ मध्ये लोकसभा सदस्यत्व संपताच कोश्यारी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले. ते २०२३ पर्यंत होते.