सिंधुदुर्गात अद्ययावत प्रयोगशाळा
By admin | Published: March 31, 2017 01:36 AM2017-03-31T01:36:15+5:302017-03-31T01:36:15+5:30
माकडताप, लेप्टो, चिकनगुनिया आदी साथीच्या आजारांची चाचणी व निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा
मुंबई : माकडताप, लेप्टो, चिकनगुनिया आदी साथीच्या आजारांची चाचणी व निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केली. प्रयोगशाळेचे काम मणिपाल एनआयव्ही आणि शिमोगा यांच्या देखरेखीखाली चालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माकडतापामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याची लक्षवेधी नारायण राणे आणि हुस्नबानू खलिपेष्ठ यांनी उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना दीपक सावंत यांनी माकडतापाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना सभागृहात सांगितल्या. सध्या हा आजार कर्नाटक, गोवा, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी या राज्यांशी समन्वय साधला जात आहे. (प्रतिनिधी)