परिषद उधळू बघणा-या शिवसैनिकांवर लाठीहल्ला
By admin | Published: April 21, 2016 02:35 AM2016-04-21T02:35:17+5:302016-04-21T02:37:08+5:30
शिवसैनिकांना अटक; शिवसैनिकांनी गदारोळ घातल्यामुळे पोलीस आक्रमक.
अकोला: वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीसाठी अकोल्यात बुधवारी आयोजित विदर्भ राज्य परिषद उधळवून लावण्याचा प्रयत्न करणार्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीहल्ला चढविला. प्रमिलाताई ओक सभागृहासमोर शिवसैनिकांनी गदारोळ घातल्यामुळे पोलीस आक्रमक झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून शिवसैनिकांना आवरले. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन केले होते. सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास अँड. अणे यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, शहर प्रमुख तरुण बगेरे, तालुका प्रमुख मुकेश मुरूमकार यांच्यासह शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत ओक सभागृहाच्या प्रांगणात प्रवेश केला. शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वारातून न येता, सभागृहामागील मनपा शाळेच्या आवारभिंतीवरून उड्या मारून प्रवेश केला. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न न करता थेट लाठीमार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकांनी सभागृह परिसरात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला.