पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीमार; पोलिसांच्या अमानुषतेची सर्व स्तरावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:35 AM2019-02-26T05:35:18+5:302019-02-26T05:35:22+5:30
राज्यभरातून दीड हजारांहून अधिक कर्णबधिर आंदोलनासाठी आले होते.
पुणे : राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे गालबोट लागले. यात काही आंदोलक जखमी झाल्याने सर्वांनी अपंग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेरील रस्त्यावर ठिय्या दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विविध स्तरांतून टीका होत आहे.
राज्यभरातून दीड हजारांहून अधिक कर्णबधिर आंदोलनासाठी आले होते. आंदोलकांनी पायी मोर्चा काढण्याचे ठरविताच काहीजण पुढे आले. तेव्हा अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर लावलेले बॅरिकेटस् पडले. त्यानंतर, उडालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. लाठीमारात अनेकांना पाय, गुडघे, पाठ व डोक्याला मार बसला. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारींसह सुमारे चारशेहून अधिक जणांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना मंगळवारपर्यंत सखोल तपास अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे.